पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पोलिस खात्यात शिपाई व पोलिस उपनिरीक्षकांच्या भरतीत मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याची विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दक्षता खात्याकडे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू झाली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पर्रीकर यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास केला असता ही भरती करताना नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मर्जीतील लोकांना ही पदे बहाल करण्यासाठी वेळोवेळी भरती नियमांत करण्यात आलेले बदल, लेखी परीक्षेतील उमेदवारांना गुण देताना झालेले गौडबंगाल आदी अनेक प्रकरणांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे.
दरम्यान,दक्षता खात्याकडे सध्या तक्रारींची रास पडली असून तेथे अनेक रिक्त पदे अजूनही भरली जात नसल्याने या तक्रारींची चौकशी करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. दक्षता सचिव व्ही. के. झा यांनी या खात्यात सुधारणा घडवून आणल्या असून गेल्या तीन ते चार महिन्यात सुमारे २० ते ३० प्रकरणे निकालात काढल्याची माहिती त्यांनी दिली. अशा अनेक प्रकरणांत काही अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुनावण्यात आली आहे; तर काही अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. दक्षता खात्याकडून लोकांची अपेक्षा मोठी असली तरी या खात्याला प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत राहूनच पार पाडावी लागते,असेही ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment