कॉंग्रेस नेत्यांनी घेतला धसका
मडगाव, दि. २(प्रतिनिधी) : माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या विरोधात गेला महिनाभर ज्या खटपटी लटपटी गोव्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमधील तसेच राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोेधकांनी केल्याने, त्याचा विपरीत परिणाम होण्याऐवजी माजी पर्यटनमंत्र्याचे बाणावली व नुवेमधील स्थान अधिकच बळकट झाल्याचे दिसत असून चर्चिल व कंपनीने मिकीविरुध्द केलेले प्रयत्न त्यांच्यावरच बूमरँग होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
मिकी यांनी मावळत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बेताळभाटीमध्ये दिमाखात साजरा केलेला वाढदिवस, त्यासाठी जमलेली त्यांच्या समर्थकांची गर्दी तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लावलेली उपस्थिती व त्या वाढदिवसाचे निमित्त करून मिकी यांनी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसशी युती न करता सर्व चाळीसही जागा लढविण्यासाठी पक्ष नेतृत्वाला दिलेला सल्ला, यामुळे बाणावली व अन्य मतदारसंघांत आपल्या नातेवाईकांना उभे करण्याचा मनसुबा रचलेल्यांनी त्यांच्या या संकेताचा धसका घेतला व पुढच्या घडामोडी घडल्या, असे राजकीय निरीक्षक मानतात.
मिकी यांचे राजकीय बळ ओळखून, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळात सामील करण्याचा आपला निर्णय कॉंग्रेसला कळविला.मंत्रिपद नसतानाही त्या गुर्मीत व ताठ्यात वावरणार्या मिकींकडे मंत्रिपद आले तर काय होईल, या विचारानेच गलितगात्र झालेल्या दहा जणांनी मग मडगावात एकत्र येऊन त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशास विरोध केला व त्यासाठी प्रसंगी सरकार पाडण्याचा इशारा दिला. त्यांच्या या निर्णयामागे नेमके कोण आहे त्याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त केले जातात, परंतु साधारण गेला पंधरवडाभर चालू असलेल्या या राजकीय खेळाचा मागोवा घेतला तर मिकी यांचा मतदारसंघ असलेल्या बाणावलीतील स्थान त्यांनी आपण आगामी निवडणूक नुवेतून लढवणार असे जाहीर करूनही पूर्वीपेक्षाही बळकट झालेले दिसून येत आहे. ती बाब प्रत्यक्षात मिकीपेक्षा स्वतः च्या कन्येला बाणावलींतून उभे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चर्चिल यांना प्रतिकूल ठरत चालली आहे. कारण आज तेथे मिकींबाबत लोकांमध्ये कमालीची सहानुभूती व तितकीच चर्चिलविरोधी भावना झालेली दिसून येत आहे.
मिकी पाशेकोंवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत व त्यातून ते पंधरवडाभर तुरुंगात राहूनही आलेले आहेत व सध्या जामिनावर आहेत पण तरीही त्यांच्या एका हाकेसरशी हजारांनी लोक धावून येताना असे पहायला मिळते. नादिया प्रकरणात त्यांचे जामिनाचे वा अन्य अर्ज सुनावणीस येत असताना, न्यायालयात त्यावरील सुनावणी ऐकण्यासाठी ज्या उत्सुकतेने त्यांचे समर्थक येत होते, पोलिस व गुन्हा अन्वेषणाच्या नावाने बोटे मोडत होते त्यांची तीच भावना अजून कायम दिसत आहे. नादिया प्रकरणात ते निरपराध आहेत, ती निव्वळ आत्महत्या असून मिकींचा राजकीय काटा काढण्यासाठी ज्या लोकांनी त्यावेळी धडपड केली होती तेच लोक आज वेगळ्या पध्दतीने त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेश अडवीत आहेत असा आरोप त्यांचे समर्थक करीत असून त्यातून परत एकदा मिकीप्रती त्यांची सहानुभूती वाढली आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते हाती असलेल्या राजकारण्यांनाही मिकी यांनी सर्व ४० ही मतदारसंघ लढविण्याची घोषणा करून अक्षरशः घाम काढला आहे तो हाती मंत्रिपद नसताना व गुन्हा अन्वेषणाने बँकखाती सील केलेली असताना. अशाच स्थितीत त्यांनी कर्नाटकात राजकीय संकट उद्भवलेले असताना तेथील सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. मिकींना सध्या मंत्रिपद किंवा लाभाचे कोणतेच पद हाती नसताना बाणावली व नुवेतील त्यांची कामे व दारात आलेल्यांना मदत करण्याचे काम पूर्वीच्याच नेटाने चालू आहे व त्यामुळेच त्यांचा धसका घेऊन त्यांचे विरोधक त्यांच्या मंत्रिपदाला विरोध करीत असून त्यांचा हा विरोधच मिकींसाठी ‘प्लस पॉंईट’ ठरला आहे.
Monday, 3 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment