-वृत्तवाहिनीतर्फे स्टिंग ऑपरेशन
-माफिया-पोलिस साटेलोटे स्पष्ट
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पोलिस खात्याला जबरदस्त धक्का बसला असून, अमली पदार्थविरोधी पथकात सेवा बजावलेल्या एक उपनिरीक्षक विदेशी पर्यटकाला अमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कॅमेराने
टिपल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने अमली पदार्थविरोधी पथकात असलेला आणि सध्या सुरक्षा विभागात सेवेत असलेला उपनिरीक्षक सुनील गुडलर हा एका विदेशी तरुणीला चरस विकत असल्याचे या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड केले आहे.
पोलिसच अमली पदार्थ विकत असल्याने आता पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाला आणखी पुष्टी मिळाली आहे. मात्र, या प्रकारावर पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आपण ते चित्रिकरण पाहिल्यानंतर बोलेन, असे श्री.देशपांडे यांनी सांगितले.
एका फ्लॅटमध्ये उपनिरीक्षक गुडलर हा स्पष्ट दिसत आहे. त्याच्या बाजूला बसलेली तरुणी त्याच्याकडे अमली पदार्थाची मागणी करते. यावेळी गुडलर आपल्या जीन्स पँटमधून काही तरी वस्तू काढतो आणि तिच्या हातात देतो. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती गुडलर यांनी दिलेला चरस स्पष्टपणे त्या गुप्त ठेवण्यात आलेल्या त्या कॅमेर्यावर दाखवतो. मात्र, नेमकी कोणती वस्तू गुडलर यांनी आपल्या खिशातून काढली हे स्पष्ट दिसत नाही.
चरसचा तुकडा त्या विदेशी तरुणीच्या हातात पडल्यानंतर तो किती जुना असावा, अशा प्रश्न ती त्याला करते. त्यावेळी गुडलर एक दोन वर्षाचा असू शकतो, आपल्याला नेमकी माहिती नाही, असे उत्तर देतो. त्यानंतर समोर बसलेली तरुणी त्याला‘तुम्ही यात एकदम सराईत आहात’ असे म्हणते. यावर उपनिरीक्षक गुडलर खदखदून हसतो.
ड्रग पॅडलर ‘दुदू’ याला अटक केल्यानंतर उपनिरीक्षक सुनील गुडलर याचा पोलिस महासंचालकांंच्या हस्ते गौरव करण्यात आला होता, तसेच दुदू याला अटक केल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यासह पाच पोलिसांचे ड्रग माफियांशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. तसेच, या सर्वांना अटक करण्यातही श्री. गुडलर याचा सहभाग होता.
‘दुदू’ या ड्रग माफियाची चौकशी ड्रग विक्री करताना उघडकीस आलेला गुडलर याने केली असून काही दिवसांपूर्वी दुदू याच्यावर आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक वेणू बंसल यांची गोव्यातून बदली होण्यापूर्वी श्री. गुडलर यांनी अमली पदार्थविरोधी पथकातून आपली बदली करून घेतली होती. सध्या तो सुरक्षा विभागाच्या सेवेत होता. गेल्या वर्षीही गुडलर आपल्याला अमली पदार्थाची विक्री करीत होता, असा दावा या विदेशी तरुणीने केला आहे.
Wednesday, 5 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment