Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 3 January 2011

कांदे नव्वदी गाठणार!

सरकारचे आश्‍वासन फोल

‘फलोत्पादना’चे कांदे कुजके व अपुरे

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
सरकारने कांदे स्वस्त करण्याची कितीही आश्‍वासने दिली तरी त्यांची आश्‍वासने इतर आश्‍वासनाप्रमाणे फोलच ठरत आहेत. कारण आज विविध बाजारपेठेत कांद्याचे भाव आणखीनच वाढले आहेत. त्यामुळे कांदे स्वस्त होणे शक्य नाही! हे सिद्ध झाले आहे. आज पणजी बाजारात कांदे ६५ ते ७० रुपयांपर्यंत प्रति किलो विकले जात होते. दोन दिवसांपूर्वी हा दर ५० रु.च्या आसपास होता. त्यामुळे पुढील काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांचा वांदा करून नव्वदी गाठण्याची शक्यता आहे.
-सरकारचे आश्‍वासन फोलच
राज्य व केंद्र या दोन्हीकडे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच युवा कॉंग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांत बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते की भाजपाने एका दिवसासाठी कांदा स्वस्त दिला, आम्ही दररोज कांदा स्वस्त देऊ! पण कुठचे काय? फलोत्पादन केंद्रांमध्ये चार पाच दिवस कांदा उपलब्ध केला तोही कोंब आलेला व कुजका! आता या केंद्रांवर कांदाच दृष्टीला पडत नाही. या केंद्रमालकंाना विचारल्यास कांदे कमी पाठवतात, तसेच एका माणसाला एक किलोच देण्याचे आदेश आहेत, एवढे असूनही ते अपुरे कांदे एका तासातच संपतात, अशी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांदे स्वस्त होतील,अशी आश्‍वासने केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांपासून युवा नेते सुध्दा गेले अनेक दिवस देत होते, ती फोल ठरली असून कुजके व कोंब आलेले तेही अपुरे कांदे देण्याचे नाटक त्यांना फार दिवस वठवता आलेले नाही.

No comments: