फोंडा, दि.१ (प्रतिनिधी): नववर्ष २०११ च्या पहिल्याच दिवशी आज (दि.१) पहाटे पावणे पाचच्या सुमारास मुस्लिमवाडा भोम येथे रस्त्यावर उभा करून ठेवण्यात आलेल्या मालवाहू ट्रकला (क्र. केए-१६-ए-७४३६) पाठीमागून मोटरसायकलने (क्र.जीए-०७-डी-१३०९) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले.
या अपघातात मृत झालेल्या दोघांची ओळख पटली असून तिसर्या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. सुराधिश शिवानंद नाटेकर (२४ वर्षे, रा. दिवाडी) आणि मनोहर गंगाधर पाटील (२९ वर्षे, ओल्ड गोवा) अशी दोघांची नावे आहेत. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात मृत झालेले तिघेही एकाच मोटरसायकलवरून भोम येथे कालोत्सवाला आले होते. पहाटेच्या वेळी घरी परत जात असताना त्यांच्या मोटरसायकलची धडक मालवाहू ट्रकाला बसली. हा मालवाहू ट्रक चित्रदुर्ग कर्नाटक येथून आमोणा येथे जाण्यासाठी आला होता, चालकाने रात्रीच्या वेळी मुस्लिमवाडा भोम येथे रस्त्यावर उभा करून ठेवला होता. ट्रकचे पार्किंग सिग्नल सुद्धा चालत नव्हते. रस्त्यावर उभा करण्यात आलेला हा ट्रक मोटरसायकल चालकाच्या दृष्टीस न पडल्याने मोटर सायकलची ट्रकाच्या मागील बाजूला जोरदार धडक बसली. त्यामुळे तिघांचे जागीच निधन झाले. तिघांच्या डोक्याला तसेच अंगाला गंभीर जखमा झाल्या होत्या, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक के. एच. विजय हनुमंतप्पा (दावणगिरी) याला अटक केली आहे. निष्काळजीपणे ट्रक पार्क केल्याचा आरोप ट्रक चालकावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.
Sunday, 2 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment