Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 7 January 2011

सांगे परिसर हादरला

जोरदार धक्क्यामागील कारणाचे गूढ कायम
कुडचडे, दि. ६ (प्रतिनिधी): सांगे तालुक्यातील उगे व आसपासच्या परिसरात आज (गुरुवारी) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान जोरदार धक्का बसल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कसल्याही स्वरूपाची वित्त अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंप की खाणीच्या ब्लास्टिंगमुळे हा धक्का बसला यामागचे गूढ अद्याप कायम आहे.
अधिकृतरीत्या याबाबत कोणतीच माहिती न मिळाल्याने स्ङ्गोट व त्यापाठोपाठ जाणवलेला धक्का नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही.
उगे येथील सौ. स्वेता सत्यवान नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या सकाळी स्वयंपाकघरात भाजी करत असताना मोठा आवाज होऊन जमीन हलू लागली, यापूर्वी ब्लास्टिंगमुळे घराच्या खिडक्यांची तावदानेच हादरत असत. सकाळी मात्र सारी जमीन हादरली.
सांगे येथील प्रिया मोरजकर या गृहिणी सकाळी घरात काम करत असताना घरातील भांडी, खुर्ची, पिशव्या जमिनीवर पडल्याने मुले घाबरून घराबाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.
बेकरीमध्ये पाव तयार करण्यासाठी एकावर एक रांगेत ठेवलेल्या स्टील प्लेट्स जमीन हादरल्याने खाली कोसळल्याची माहिती माजी नगराध्यक्षा श्रीमती आग्नेला डिकॉस्टा यांनी सांगितले.
कोयना धरणाप्रमाणेच साळावली धरणाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची चर्चा सांगे परिसरात सकाळपासून सुरू आहे. दिवसभर सांगे बाजारात लोकांमध्ये याविषयी उलटसुलट चर्चा सुरूच होती. साळावली धरणावर सुरक्षा कारणांमुळे लोकांना यापूर्वीच मनाई करण्यात आल्याने भूकंपामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झालेला नाहीना याविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या.
गेल्या वर्षी वालकिणी भागात अशाच प्रकारचा स्फोट होऊन शाळा व घरांच्या भितींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे आज सकाळी पुन्हा तसाच धक्का बसल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. काही इमारतींना तडे गेले. अनेकजण त्यानंतर ‘भूकंप भूकंप’ असे जोरजोराने ओरडत घराबाहेर धावताना दिसत होते.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात छोटे मोठे धक्के सातत्याने बसत असतात. त्यात नवे काहीच नाही. मात्र सकाळचा धक्का जास्त काळ टिकल्यामुळे लोक धास्तावले आहेत. टी.व्ही. चॅनेल्स व पत्रकारांनी साळावली धरणाच्या जलस्त्रोत खात्याचे अभियंते रवींद्र यारागट्टी यांना भेटून धरणाला कोणताही धोका जाणवल्याचे विचारले असता यासंबंधी कोणतीही माहिती देण्याचे त्यांनी नाकारले आणि मुख्य अभियंत्याकडून लेखी परवानगी आणण्यास सांगितले. यानंतर धरण परिसरातील तपासणी करण्यासाठी अभियंत्यांसह इतर अधिकारी आत गेले असता पत्रकारांना गेटमधून प्रवेश नाकारण्यात आला. तसेच धरणाच्या सुरक्षेबद्दल कोणतीही माहिती देण्यास मनाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या यंत्रणेद्वारे भूकंपाची माहिती मिळू शकली असती; पण अभियंत्याकडून यासंबंधी माहिती न मिळाल्याने लोकांना तर्कवितर्क करण्यावरच समाधान मानावे लागले.
-------------------------------------------------------------
कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि..
सांगे, उगे भाटी, विलीयण, तारीपांटो, मुगोळी, दांडो, शेळपे व इतर परिसरात मोठा आवाज झाल्यानंतर संपूर्ण जमीन सुमारे १५ सेंकदांपर्यंत हादरली यावेळी लोकांच्या घरांतील भांडी व चीजवस्तू खाली कोसळल्या. त्याचबरोबर लोकांनीही घरातून जिवाच्या आकांताने धूम ठोकली. स्थानिक पोलिसांनीही या धक्क्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.

No comments: