भाजपने काढले गृह खात्याचे वाभाडे
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): पोलिस अधिकारी व गुन्हेगार यांच्यातील साट्यालोट्याची मालिकाच उजेडात येत असताना गृहमंत्री रवी नाईक व वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांना ‘क्लीनचीट’ देत सुटले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्याकडूनही विदेशी महिलांना ड्रग पुरवण्याचे कथित प्रकरण उघड झाल्याने आता गृह खात्याचे वस्त्रहरण झाले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांसह संपूर्ण पोलिस खात्याचीच पुनर्रचना करा, अशी जोरदार मागणी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.
श्री. आर्लेकर यांनी पोलिस खात्याचा कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. यापूर्वी पोलिस व ड्रग माफिया यांचे साटेलोटे उघड केल्यानंतर आता उपनिरीक्षक गुडलर यांचेही कारनामे जनतेसमोर ठेवलेल्या मीडियाचे श्री. आर्लेकर यांनी अभिनंदन केले. पोलिस व ड्रग माफियासंबंधांची चौकशी करणारे गुडलर हेदेखील वादाच्या भोवर्यात अडकल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाची चौकशी कोणत्या पद्धतीने होत असेल याचा विचार न केलेलाच बरा,असा टोलाही श्री.आर्लेकर यांनी हाणला.
ड्रगप्रकरणी चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नसतानाच सदर प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांचा मुख्यमंत्री पदकाने गौरव केला जातो यावरून गृह खाते कुठल्या दिशेने भरकटत चालले आहे, याचा अंदाज येतो,असेही ते म्हणाले. गृह खात्यावरील आरोपांवरून विरोधक जनतेची दिशाभूल करतात असा दावा करणारे गृहमंत्री रवी नाईक यांनी आता नक्की कोण दिशाभूल करतो, याचा जनतेला जाब द्यावा, असे त्यांनी बजावले.
या सर्व प्रकारानंतर गृहमंत्री रवी नाईक यांचा पोलिस खात्यावरील ताबा पूर्णपणे सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृह खाते काढून घेण्याबरोबर संपूर्ण खात्याची पुनर्रचना करा, अशी मागणी आर्लेकर यांनी केली. पोलिस खात्यात अनेक कर्तबगार व प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची पदे देण्यात यावीत. पोलिसच सामील असलेल्या या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र संस्था किंवा ‘सीबीआय’ मार्फत करण्यात यावी, या मागणीशी भाजप ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्र्यांची चौकशी ‘सक्तवसुली’मार्फत व्हावी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यालयांवर आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त सर्वत्र झळकले आहे. मुळात गेल्या काही काळात आरोग्यमंत्र्याच्या संशयास्पद व्यवहारांची यापूर्वीच चौकशी होण्याची गरज होती. विश्वजित राणे यांचे गैरकारभार उघड होण्यासाठी त्यांची व सत्तरी युवा मोर्चा संघटनेच्या व्यवहारांची सक्तवसुली विभागामार्फतच चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आर्लेकर यांनी केली. बांबोळी येथे ‘पीपीपी’ तत्त्वावर ‘सुपरस्पेशलिटी’ इस्पितळ उभारण्यासाठी एका इस्रायली कंपनीकडे केलेल्या कराराचाही सखोल तपास व्हावा. विश्वजित राणे यांना आपले सर्व व्यवहार स्वच्छ आहेत,असे वाटत असेल तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि जनतेच्या मनातील संशय दूर करावा, असेही आर्लेकर म्हणाले.
Friday, 7 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment