बेतोडा येथे बंगल्यावर छाप्यामुळे प्रचंड खळबळ
फोंडा, दि. ५ (प्रतिनिधी)
‘सपना पार्क’ बेतोडा येथील सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावर आज (बुधवारी) संध्याकाळी ४ च्या सुमारास अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी छापा घालून अंदाजे १० लाख ९३ हजार १०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
गोव्यात गुटका विकण्यास बंदी असली तरी अनेक भागांत मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जात आहे. शेजारील राज्यातून हा गुटखा चोरट्या मार्गाने गोव्यात आणला जातो आणि त्याचे वितरण विविध भागांतील विक्रेत्यांना केले जाते. गोव्यातील गुटख्याचे काही प्रमुख एजंट कार्यरत आहेत. गोव्यातील गुटखा वितरणाचे फोंडा हे प्रमुख केंद्र बनले आहे. याच फोंड्यातून विविध भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ह्या विभागाच्या अधिकार्यांनी सपना पार्क बेतोडा येथील सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावर छापा घातला. या छाप्यात आरडीएम गुटखा, कोल्हापुरी गुटखा, मधू गुटखा, सावित्री गुटखा, सोसायटी गुटखा आदी विविध प्रकारच्या गुटख्याची पाकिटे आढळून आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत सुमारे १० लाख ९३ हजार १०० रुपये एवढी आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आबेल रॉड्रिगीस, शारदा खांडेपारकर यांनी ही कारवाई केली. फोंडा मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावरील छाप्याचे वृत्त या भागात पसरताच एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या छाप्यांबाबत फोंडा पोलिसांना काहीच माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
Thursday, 6 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment