‘ओमेगा फायबर’मध्ये सुदैवाने जीवितहानी नाही
वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘ओमेगा फायबर फॅक्टरी’त
आज पहाटे ३.३० सुमारास आग लागून तेथील सामान व इतर साहित्य मिळून सुमारे तीन कोटींची मालमत्ता खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी सुमारे चार तास शर्थीची झुंज दिल्यानंतर आग विझवण्यात यश प्राप्त झाले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ‘शॉर्ट सर्किट’मुळे ती लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.
या कारखान्यासमोरील ‘ऑप्टिक फायबर’ नावाच्या कारखान्यातील एका कर्मचार्याने ज्वालांचे तांडव पाहताच याची माहिती वेर्णा अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर वेर्णा अग्निशामक दलाचा १, मडगाव अग्निशामक दलाचा २, पणजी अग्निशामक दलाचा १ व वास्को अग्निशामक दलाचा १ मिळून एकूण पाच बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण आणण्याच्या कार्यास सुरुवात केली. आगीची भीषण तीव्रता लक्षात घेता ९५ हजार लीटर पाणी ही आग विझवण्यासाठी वापरण्यात आले.
दलाच्या अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘ओमेगा फायबर फॅक्टरी’त ‘फायबर ग्लास’ बनवण्यात येत असून पहाटे लागलेल्या आगीमुळे येथे असलेले सामान, यंत्रे व इतर गोष्टी पूर्ण खाक झाल्या. कारखान्याच्या भिंती भेगाळल्या. छपराचा बहुतेक भाग कोसळल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे कारखान्याच्या मालकाला किती नुकसान सोसावे लागले याबाबत अजून पूर्ण माहिती उपलब्ध झाली नसल्याचे वेर्णा अग्निशामक दलाचे प्रमुख एस. व्ही. पाळणी यांनी सांगितले. कारखान्याचे मालक मंजितसिंग यांच्याशी संपर्क साधला असता, हानीचा आकडा तीन कोटींहून अधिक असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला. वीज खात्याला यासंदर्भात कारखान्याचे सर्वेक्षण करून आग लागण्यामागचे कारण शोधण्याबाबत कळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सदर फॅक्टरी’ च्या बाजूला अन्य काही कारखाने असून आगीबाबत अग्निशामक दलाला ताबडतोब माहिती मिळाल्याने संभाव्य अनर्थ टळला. आग अन्यत्र फैलावली नाही. दुपारपर्यंत अग्निशामक दलाचे जवान येथे काही ठिकाणी छोट्या मोठ्या वस्तूंना लागलेली आग विझवत असल्याचे दिसून आले.
नितीन रायकर, एस. व्ही. पाळणी, जी. बी. शेट्ये, बॉस्को फेर्राव आदी अग्निशामक अधिकार्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून जवानांना आग विझवण्याबाबत मार्गदर्शन केले.
वेर्णा पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. पोलिसांनी आगीच्या घटनेचा पंचनामा केला. नववर्षाच्या सुरुवातीपासून मुरगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या असून आजची घटना (मुरगाव तालुक्यात) सर्वांत भयंकर घटना असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता सांगितले.
आग विझवण्यात आल्यानंतर कारखान्यात काही पत्रकार गेले असता येथील सर्व वस्तू, सामुग्री, यंत्रे व इतर साहित्य खाक झाल्याचे त्यांना दिसून आले.
-----------------------------------------------------------
छपराचे पत्रे भेदून ज्वाळा उफाळल्या
आगीचे स्वरूप असे भयावह होते की, कारखान्याच्या छपराचे पत्रे भेदून ज्वाळा उफाळत होत्या. दाट धुक्यात लांबूनही आगीचे तांडव दिसत होते. पाच बंबांनी चार तास शर्थीची झुंज दिल्यानंतरच
ही भयंकर आग आटोक्यात आली.
Friday, 7 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment