पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर या विभूतींनी आपले सारे आयुष्य स्वधर्म व स्वदेशासाठी झिजवले. याच्या उलट सध्याच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे देशाची अधोगती झाली आहे. गौरवर्णीय विदेशी जाऊन काळ्या कातडीचे स्वदेशी सामान्यांवर अत्याचार करत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळेच या राष्ट्राला सद्यःस्थितीत छ. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या देशप्रेमाने ओथंबलेल्या नेतृत्वाची गरज आहे असे प्रतिपादन
विख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज पर्वरी येथे केले.
पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुलात भारत विकास परिषद व जनहित मंडळ पर्वरी यांनी सयुंक्तपणे आयोजिलेल्या शारदा व्याख्यानमालेत ‘नथुराम ते देवराम’ या विषयावर श्री. पोंक्षे बोलत होते.
श्री. पोंक्षे यांनी समई लावून व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. यावेळी ‘गोवादूत’चे संचालक सागर अग्नी, भारत विकास परिषद - पर्वरीचे अध्यक्ष बिपीन नाटेकर, जनविकास मंडळ - पर्वरीचे अध्यक्ष डॉ. भिवा मळीक, व्याख्यानमालेचे संयोजक संतोष कामत व्यासपीठावर उपस्थित होते. मेघना देवारी यांनी सूत्रनिवेदन केले. सुकन्या मणेरीकर हिने ‘वंदे मातरम’ सादर केले. श्री. पोंक्षे यांच्या हस्ते साप्ताहिक ‘विवेकने’ पानिपत संग्रामावर काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय अथिती म्हणून बोलताना सागर अग्नी यांनी वैचारिक प्रगल्भता वाढवून देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणार्या कार्यक्रमांच्या आयोजनाची गरज प्रतिपादली.
श्री. पोंक्षे यांनी दोन तासांच्या व्याख्यानात हास्याचे कारंजे उडवत व अंतर्मुख करण्यास लावणारे विचार व्यक्त करत कॉंग्रेस संस्कृतीवर कोरडे ओढले. ‘नथुराम’ या नाटकातील नथुराम व वादळवाटा या मालिकेतील ‘देवराम’ या भूमिकांबद्दल विचार व्यक्त केले. तसेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान देशभरात आलेले विविध संघर्षात्मक व विनोदी किस्से सांगून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले.
चित्रपटापेक्षा नाटक ही जास्त प्रगल्भ कला आहे. देशात सत्तालोलूप नेत्यांचे पुतळे उभे राहतात. संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरु, मुंबईवर हल्ला करणारा कसाब यांचा पुळका येणारी मंडळी खर्या देशभक्तांना मात्र खलनायक ठरवून त्यांचे शौर्य मातीमोल करत असल्याची खंत श्री. पोंक्षे यांनी व्यक्त केली.
मराठीतील थोर लेखकांच्या कविता, संवाद व स्वगत सादर करून श्री. पोंक्षे यांनी रसिकांकडून हसू आणि टाळ्या वसूल केल्या.सुंदर शब्दांमुळे जगण्याची ऊर्मी जागी होते असेही जीवनविषयक तत्त्वज्ञान ते गप्पांच्या ओघात सांगून गेले.
पसायदानाने या बहारदार आणि तेवढेच अंतर्मुख करणार्या व्याख्यानाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment