Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 6 January 2011

विश्‍वजित राणेंच्या कार्यालयांवर छापे

बंगळूर आयकर पथकाची कारवाई

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या ‘कारापूर ऍग्रो केमिकल्स प्रा. ली’ या कंपनीच्या कार्यालयांवर व कारखान्यावर आयकर खात्याने आज छापा टाकल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मिरामार येथील कंपनीचे कार्यालय व साखळी कारापूर येथील कारखान्यावर हे छापे टाकण्यात आले. हे छापासत्र सुरू असताना आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत हे पणजीत एका हॉटेलात एकत्रित होते, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
आज सकाळीच बंगळूर येथून आलेल्या आयकर खात्याच्या पथकाने मिरामार येथील‘कारापूर ऍग्रो केमिकल्स प्रा.ली’या कंपनीच्या कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी सदर पथकाकडून स्थानिक पोलिसांची सुरक्षेसाठी मदत घेण्यात आली होती. मिरामार व साखळी येथे एकाचवेळी छापे टाकण्यात आले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरू होते. या छाप्यात नेमकी कोणती माहिती मिळवण्यात आली किंवा कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली, याबाबत अत्यंत गुप्तता राखण्यात आली आहे. पणजी आयकर खाते व बंगळूर येथील मुख्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, मिरामार येथील सदर कंपनीच्या कार्यालयात सकाळी घुसलेले पथकातील अधिकारी तब्बल संध्याकाळी पावणे सात वाजता बाहेर आले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांचे निर्देश
महत्वाचे म्हणजे आजच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात कर वसूली करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय राजधानीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांनी हा आदेश जारी करताच ही कारवाई झाल्यानेही या छाप्याला महत्व प्राप्त झाले आहे. दिल्ली येथील थेट कर विषयक केंद्रीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर चंद्रा यांच्या कार्यालयातून आज अर्थमंत्र्यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्त व देशाच्या अठ्ठेचाळीस शहरांतील आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून कर वसूलीबाबत कडक धोरण राबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वित्त मंत्र्यांच्या या आवाहनानंतर लगेच हे छापे टाकले गेले आहेत. त्यामुळे आयकर खात्याने छाप्याआधी राणे यांच्या उद्योगाबाबत बरीच माहिती मिळविली होती हे स्पष्ट होत आहे. त्यातही बंगळूर येथून आलेल्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे या छाप्यात घबाड सापडेल असा अंदाज आहे. कारण स्थानिक आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना या छाप्यात समाविष्ट करण्यात आलेले नाही. तसेच स्थानिक आयकर खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यावेळी त्यांनी छाप्याबाबत दुजोरा न देता ‘नो कॉंमेटस्’ एवढेच सुरूवातीला उत्तर दिले. मात्र संध्याकाळी उशिरा या छाप्यांबाबत सूत्रांनी दुजोरा दिला.
दडपणासाठी राजकीय खेळी?
गेल्यावेळी बिगरकॉंग्रेस नेत्यांनी ‘जी-७’ गट तयार करून आपल्याच सरकारवर दबावतंत्र टाकण्याचे सत्र आरंभल्यानंतर आयकर खात्यातर्फे या नेत्यांवर असेच छापे टाकण्यात आले होते. बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्यावरही छापे टाकून त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. आता बाबूश व विश्‍वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करूनही पुन्हा एकदा विश्‍वजित यांच्या आस्थापनांवर टाकण्यात आलेल्या या छाप्यांमुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ फेरप्रवेशावरून उद्भवलेल्या राजकीय वादाबाबत विश्‍वजित राणे यांनी मौनव्रत धारण केले होते व त्याबाबत अनेकांना कुतूहल लागून राहिले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून विश्‍वजित राणे यांच्यामार्फत मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे प्रयत्न होतील, या शक्यतेनेच कॉंग्रेसकडून हे छापासत्र सुरू झाल्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
वृत्त न देण्यासाठी
राजकीय दबाव
या छाप्यांचे वृत्त काही प्रसारमाध्यमांकडून मुद्दामहून दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. छाप्यांचे वृत्त देऊ नये यासाठी सदर वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडियावर राजकीय दबाव आणण्यात आला होता.

मोठे घबाड!
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या आयकर खात्याच्या छाप्यात अनेक महत्वाचे दस्तऐवज सापडल्याचे विश्‍वसनीय वृत्त असून त्यांची छाननी सध्या सुरू आहे. या कागदपत्रांच्या छाननीअंती खात्याच्या हाती भले मोठे घबाड लागण्याची खात्री आयकर खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केल्यामुळे या छाप्यात खात्याच्या गळाला मोठा मासा लागण्याचे संकेत मिळत आहेत.

No comments: