मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): गोवा सहकारी बँकेच्या मडगाव व आके येथील शाखांना एकच वेतन प्रमाणपत्र सादर करून सुमारे सात लाखांचे कर्ज घेतल्या प्रकरणी पोलिसांनी तिळामळ येथील हायरसेकंडरीत प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करणार्या सावर्डे येथील एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याने अशाच प्रकारे दाखले सादर करून अन्य बँकांकडूनही कर्ज घेतलेले आहे की काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
संशयिताने गोवा स्टेट को-ऑपरेटिव्हच्या आके शाखेतून कर्ज घेतले होते. नंतर काही दिवसांनी त्याने मडगाव शाखेतून कर्ज घेतले. दोन्ही कर्जे न फेडता ठेवल्याने वसुलीचे सोपस्कार सुरू झाले असता दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे आढळून आले. यानंतर कर्जाची कागदपत्रे तपासली असता त्याने दोन्ही कर्जांसाठी सादर केलेले वेतन दाखले एकाच प्रकारचे असल्याचे आढळून आले. नियमानुसार कर्जासाठी एकदा दाखला घेतल्यावर परत तसा दाखला देताना पूर्वीच्या कर्जाचा त्यावर उल्लेख असायला हवा. परंतु, सदर संशयिताने सादर केलेले दाखले एकाच धर्तीचे आहेत व त्यामुळे त्यांच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी पारोेडा येथील अशाच एका शालेय कर्मचार्याने बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, येथील उमेश केणी पेट्रोलपंपवर रोखपाल म्हणून काम करणार्या दत्तू गावकर याने सुमारे लाखभराची अफरातफर करून पळ काढल्याची तक्रार दीपक हेगडे यांनी पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी भा.दं.सं.च्या ३०८ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Sunday, 2 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment