Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 2 January 2011

मडकईकर, करिशेट्टी ठरणार बाबूशसाठी डोकेदुखी

महापालिका विकास आघाडीत धुसफुस
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पणजी बाजार संकुलातील घोटाळ्याचे प्रमुख संशयित सूत्रधार उदय मडकईकर व पार्किंग घोटाळ्यात अडकलेले नागेश करिशेट्टी यांना ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या महापालिका विकास आघाडीत पुन्हा संधी दिल्याने निवडणुकीपूर्वीच आघाडीत धुसफुस सुरू झाली आहे. विविध प्रकरणांत उघडपणे आरोप झालेल्या या दोन्ही नगरसेवकांमुळे आघाडीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी विरोधी भाजपला आयतीच संधी प्राप्त झाली आहे. यामुळे हे द्वयी बाबूश मोन्सेरात यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बाबूश मोन्सेरात यांनी घोषित केल्याप्रमाणे नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पणजी महापालिकेसाठी आपल्या तीस उमेदवारांची महापालिका विकास आघाडी जाहीर केली आहे. या आघाडीत विद्यमान १३ नगरसेवकांची पुन्हा वर्णी लावण्यात आली आहे. दरम्यान, भ्रष्ट नगरसेवकांना पुन्हा संधी देणार नाही, अशी घोषणा काही काळापूर्वी बाबूश यांनी केली होती परंतु नागेश करिशेट्टी व उदय मडकईकर यांचा समावेश आघाडीत करण्यात आल्याने बाबूश तोंडघशी पडले आहेत, अशीच चर्चा सध्या सुरू आहे. पणजी बाजारसंकुलातील दुकाने वाटप प्रकरण येत्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता असून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडून नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल होण्याचाही संभव आहे. या घोटाळ्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे व त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना बाबूश यांच्या आघाडीला हे विषय त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
पणजी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित व सुज्ञ मतदार आहेत. यामुळे ताळगावप्रमाणे पणजीतील मतदारांवरही आपली मोहिनी घालण्याचे बाबूश यांचे प्रयत्न कितपत सफल होतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. पणजी मतदारसंघावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचीच मर्जी चालते व कॉंग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही. अशा परिस्थितीत ताळगाव पाठोपाठ पणजी मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा बाबूश यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला कोलदांडा
पणजी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपले स्वतंत्र पॅनल उतरवण्याचा विचार चालवला आहे. अलीकडेच राष्ट्रवादीतर्फे पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेच्या अनुषंगाने पणजी महानगरपालिका निवडणूक घोषित झाल्याने इथूनच कॉंग्रेसला कोलदांडा घालण्याची व्यूहरचना पक्षातर्फे आखली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा पणजी महापालिकेचे विद्यमान नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मिकी पाशेको यांच्याकडे गोव्यातील पक्षाची धुरा सोपवण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. बाबूश मोन्सेरात यांनी अलीकडेच मिकी पाशेको यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्याने या निवडणुकीत उतरण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मागील निवडणुकीत ऍड. भोसले हे बाबूश पॅनलचे सदस्य होते. यंदा मात्र ऍड. भोसले यांच्यासह अन्य चार नगरसेवकांना बाबूश यांनी वगळले आहे.
भाजपची जय्यत तयारी सुरू
बाबूशच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे पॅनल जाहीर होणार असून पणजी महापालिकेचे पहिले महापौर अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली व मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात असून लवकरच ती घोषित होईल, अशी माहिती अशोक नाईक यांनी दिली. बाबूश यांनी सर्वप्रथम आपले उमेदवार घोषित केल्याने भाजपला उमेदवार निवडताना फायदा होणार आहे. बाबूश पॅनलच्या प्रत्येक उमेदवाराची ताकद अजमावून त्याला जबरदस्त टक्कर देणारा तोलामोलाचा उमेदवार भाजपतर्फे उतरवण्यात येणार आहे.

No comments: