नऊ टन कांदा फक्त दोन तासांत संपलासुद्धा!
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
देशभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आणलेल्या व पणजी बाजारात ७८ रु. प्रति किलो भावाने विकल्या जाणार्या कांद्याची आज दि. २४ रोजी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे फक्त ३० रु. किलो दराने विक्री करण्यात आली तेव्हा या योजनेला तडाखेबंद प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. या योजनेचा फायदा घेण्यासाठी पणजी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
येथील भाजप कार्यालयासमोर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर, पणजीच्या नगरसेविका दीक्षा माईणकर, ज्योती मसुरकर, पणजी महिला मोर्चा प्रमुख प्रीती शेट्ये, नीना नाईक, प्रशीला कुकळकर, शुभा धोंड, माजी महापौर अशोक नाईक यांच्यासह पणजी महिला मोर्चा व राज्य महिला मोर्चाच्या सदस्य तथा कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या वेळी दोन किलो, पाच किलो अशा स्वरूपात नऊ टन कांद्याची विक्री करण्यात आली.
पर्रीकरांनी काढले सरकारचे वाभाडे
वारंवार महागाई वाढवून सरकार लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. गोवा सरकार अस्थिर व भ्रष्टाचारी असल्याने त्याचे सर्वसामान्यांच्या प्राथमिक व दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. फलोद्यान महामंडळातर्फे लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करणे सरकारला सहज शक्य असताना सरकार कोणतीही हालचाल न करता फक्त कुठे भ्रष्टाचार करता येतो का याकडे लक्ष ठेवून आहे, अशी टोलेबाजी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याप्रसंगी केली.
वाहतूक खर्च, पॅकिंग खर्च व इतर कपात याची मिळून सुमारे प्रति किलो पाच रुपये नुकसान स्वीकारून ही विक्री करण्यात येत आहे. भाजप हा लोकांची काळजी घेणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षाने हे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले.
..तर महागाई झालीच नसती ः कुंदा चोडणकर
जर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असते तर महागाईचा असा कडेलोट झालाच नसता, असे प्रतिपादन याप्रसंगी प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी केले. भाजपच्या कारकिर्दीत सर्वसामान्यांच्या गरजेच्या व दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरावर नेहमीच नियंत्रण ठेवण्यात आले होते. आम आदमीच्या नावाचा जप करणारे विद्यमान सरकार हे फक्त स्वहितात दंग असून त्यांना लोकांच्या प्रश्नांची जरासुद्धा काळजी नाही. महिला मोर्चातर्फे यापूर्वीही अल्प दरात पामतेल व नारळ उपलब्ध करून देण्यात आले होते याचीही सौ. चोडणकर यांनी यावेळी आठवण करून दिली. एकूणच भाजपच्या या अभिनव योजनेबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यमान सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
Saturday, 25 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment