Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 23 December 2010

दिवसभरात काय घडले..

- शरद पवारांनी, मिकींनी मंत्रिपद देण्याचा
आदेश मुख्यमंत्री कामत यांना दिले.
- मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून आल्यावर
लगेच याविषयी माहिती दिली.
- त्यानंतर चर्चिल आलेमाव यांनी दिला
सरकार खाली खेचण्याचा इशारा
- सरकारविरोधात दहा आमदार
एकवटल्याने मुख्यमंत्री पेचात.


मिकींना मंत्री कराल तर सरकार खाली खेचणार

चर्चिलसह दहा आमदारांच्या गटाची धमकी


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिपदावरून हटवून मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिमंडळात लावण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारातून बाहेर पडू, अशी थेट धमकीच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस मंत्री व आमदारांच्या एका गटाने दिली. त्यामुळे गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार बनला आहे.
आजच दिल्लीहून गोव्यात परतलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिमंडळात लावण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर लगेच या गटाने बैठक घेऊन पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. कॉंग्रेस गटाचा हा इशारा म्हणजे अप्रत्यक्ष राष्ट्रवादीचे श्रेष्ठी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनाच आव्हान देण्याचा प्रकार ठरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंत्रिपद फेरफार प्रकरणी चर्चेसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत आज दुपारी गोव्यात परतले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याशी संपर्क साधून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. या विषयी कॉंग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. दिगंबर कामत यांची कॉंग्रेस श्रेष्ठींशी दिल्लीत भेट झाली नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले. कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनीही या प्रकरणात विशेष रस न घेण्याचे तंत्र अवलंबिल्याने मुख्यमंत्री एकाकी पडले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कामत हेच स्वतः मिकींच्या समावेशाला राजी नसल्याचीही खबर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी केलेल्या या सूचनेची माहिती मिळताच मंत्री चर्चिल आलेमाव यांनी कॉंग्रेसचे मंत्री व आमदारांची बैठक पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोलवली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या गटाची भूमिका मांडली. याप्रसंगी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, पंचायतमंत्री बाबू आजगावकर, जलस्त्रोत्रमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, आमदार आग्नेल फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर, बाबू कवळेकर, फ्रान्सिस सिल्वेरा, रेजिनाल्ड लॉरेन्स हजर होते. आमदार प्रताप गावस यांचाही या गटाला पाठिंबा असल्याचा दावा चर्चिल यांनी केला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या भूमिकेबाबत मात्र कुणीही दावा केला नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. आता अनेक गुन्हेगारी प्रकरणांत पोलिस तथा ‘सीबीआय’ चौकशी सुरू असलेले मिकी पाशेको कसे काय चालतात, असा सवाल चर्चिल यांनी आपल्याच श्रेष्ठींना केला आहे. गोव्याचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांनी तात्काळ गोव्यात येऊन याविषयी तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. आता मिकी पाशेको यांची चौकशी सुरू असताना त्यांना मंत्रिपदावर बसवणे कितपत योग्य ठरेल, असे बाबू आजगांवकर म्हणाले. यापुढे निवडणुकीसाठी जनतेसमोर जावे लागणार असून जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचारी व गुन्हेगारांना मंत्रिपदे नको, हे कॉंग्रेसचे धोरण आहे व त्या धोरणानुसारच मिकी पाशेको मंत्रिमंडळात नको, असे चर्चिल म्हणाले.
दरम्यान, बाबूश मोन्सेरात यांची पोलिस चौकशी, एका घरात एकापेक्षा अधिक मंत्रिपदे, अनुसूचित जमातीच्या एकमेव आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यावरील अन्याय आदी प्रकार कॉंग्रेसच्या धोरणात बसतात काय, असा सवाल पत्रकारांनी करताच मात्र चर्चिल यांची बोलतीच बंद पडली. त्यांनी मग केवळ मिकी पाशेको प्रकरणीच बोलण्याचाच हट्ट धरला. ‘जी-७’ गटात मिकींबरोबर असलेले बाबूश मोन्सेरात अचानक त्यांच्यावर कसे काय फिरले, असे पत्रकारांनी विचारताच आता आपण कॉंग्रेसच्या भूमिकेशी बांधील असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस नेत्यांच्या भावना दिल्लीत पोहोचवणार
मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून कॉंग्रेसचे मंत्री व आमदारांनी व्यक्त केलेली भावना दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहचवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी या घटनाक्रमामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. हा विषय सामंजस्याने सोडवला जाईल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
नाट्याचे दिग्दर्शक मुख्यमंत्रीच!
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तथा वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावा,असे स्पष्ट आदेश दिले असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आढेवेढे घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. ते स्वतः मिकींच्या समावेशास राजी नाहीत व त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरूनच कॉंग्रेस गटाने ही धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सूत्रांनी केला.राष्ट्रवादीतर्फे मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करावा अथवा करू नये हा या पक्षाचा सर्वाधिकार आहे. त्यामुळे त्यात कॉंग्रेसला हस्तक्षेप करण्याची गरजच नाही. मिकी पाशेको यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे पालुपद लावून आपण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ असल्याचा आव आणणारे कॉंग्रेस नेते भ्रष्टाचारात कसे बुडाले आहेत, हे समस्त गोमंतकीयांना ठाऊक आहे, अशी मल्लिनाथी एका पदाधिकार्‍याने केली. दक्षिणेतील एका कॉंग्रेस नेत्याने तर ‘गोलमाला’तून मिळणारा पैसे मोजण्यासाठी ‘मशीन’ खरेदी केल्याचा जबरदस्त ठोसा राष्ट्रवादीच्या या पदाधिकार्‍याने लगावला.

No comments: