Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 December 2010

आणखी ३ आठवडे तरी कांदा रडवणारच!

नवी दिल्ली, दि. २१ : चिरला जात असताना सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता वेगळ्याच तर्‍हेने सर्वांना रडवणार आहे. ७० ते ८० रुपये प्रतिकिलो एवढ्या भावाने कांदा विकला जात असल्याने सर्वसामान्य माणसाला तो विकत घेण्याचा विचारही सोडून द्यावा लागत आहे. सरकारने मात्र आज म्हटले आहे की, येत्या दोन-तीन आठवड्यांत कांद्याच्या किमती खाली येतील. कांद्याचे भाव किती खाली येतील? सर्वसामान्य माणसाला कांदा खरेदी करण्याइतपत त्या असतील की नाही? याबाबत मात्र सरकारने कोणताही खुलासा केलेला नाही.
कांदा आयात करण्याची तातडीची कोणतीही योजना नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. असे असले तरी पाकिस्तानातून उत्तर भारतातील बाजारात कांद्याचे काही ट्रक येत आहेत. कालच १५ ते २० ट्रक कांदा वाघा सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्या देत होत्या. महाराष्ट्रातील नाशिकजवळील कांदा बाजारात कांद्याच्या ठोक बाजारातच कांद्याला ७० रुपये एवढा भाव मिळत असल्याचे वृत्त असल्याने हा कांदा दिल्लीसारख्या बाजारात विकला जाईल त्यावेळी त्याची किंमत ही १०० रुपये झालेली असेल, असे काहींचे म्हणणे आहे.
कांद्याचे हे चढे भाव आणखी दोन-तीन आठवडे तरी तसेच राहतील व त्यानंतरच कांद्याच्या भावात थोडाङ्गार उतार येईल, असे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज दिल्लीच्या तसेच देशातील इतर प्रमुख शहरांच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ७० ते ८० रुपये किलो असा आहे. काही दिवसांपूर्वीचा कांद्याचा हा भाव ३० ते ३५ रुपये किलो असा होता. कांद्याचा प्रमुख उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अकाली पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांत उत्तरप्रदेश, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतूनही कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या किमती खाली येण्यास प्रारंभ होईल, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. कांद्याच्या किमती एवढ्या का भडकल्या आहेत, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता पवार बोलत होते. कांद्याच्या या वाढत्या भावाकडे बघता केंद्र सरकार कांदा आयात करणार का, असे विचारले असता पवार म्हणाले, आजतरी कांदा आयात करण्याची कोणतीही योजना वा प्रस्ताव नाही.
पाकिस्तानचा कांदा
दरम्यान, उत्तर भारतातील काही व्यापार्‍यांनी पाकिस्तानमधून कांदा आयात करण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानमधून येणार्‍या कांद्याच्या किमती १८ ते २० रुपये किलोेे आहेत. असे असले तरी पाकिस्तानमधून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कांदा मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात होऊ लागल्याने पाकिस्तानमध्येही कांद्याचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यात १५ जानेवारीपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच निर्यात होणार्‍या कांद्याचे भावही दुप्पट करण्यात आलेले आहेत. यामुळेही देशांतर्गत कांद्याच्या किमती कमी होण्यास मदत होईल.
गॅस सिलिंडर, डिझेलच्या दरवाढीसाठीही सज्ज व्हा!
पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता
एकीकडे कांद्याचे दर गगनाला भिडलेले असताना आणि काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दरही वाढवण्यात आल्यानंतर आता डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीची वेळ आली आहे. याविषयीचा निर्णय संबंधित मंत्रिगटाच्या पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव एस. सुंदरेशन यांनी आज बैठकीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, इंधनविषयक मंत्रिगटाची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नुकतेच पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. पण, अजूनही तेल कंपन्यांना डिझेल आणि सिलिंडरच्या विक्रीतून तोटा सहन करावाच लागतो आहे. त्यामुळे यांच्या किमतीही वाढविण्याबाबत त्यांची वारंवार मागणी होत आहे. सध्याच त्याविषयी निर्णय होईल की नाही, हे सांगता येत नाही. आगामी मंत्रिगटाच्या बैठकीतच यावर विचार होईल, असे सांगून सुंदरेशन यांनी दरवाढीविषयी बोलणे टाळले.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वातील मंत्रिगटाची बैठक २२ डिसेंबर रोजी होणार होती. पण, काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली.

No comments: