बाणावली - नुवेतील मिकीसमर्थक बनले आक्रमक
मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी)
आमदार मिकी पाशेको यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविरुद्ध मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अवलंबलेल्या वेळकाढूपणाचा जोरदार निषेध करत बाणावली आणि नुवे मतदारसंघांतील मिकीसमर्थकांनी आज प्रथमच उघड पवित्रा घेऊन कॉंग्रेसने युतीचा धर्म पाळावा व मिकींचा मंत्रिमंडळात समावेश करावा, असे निक्षून बजावले.
आपल्या प्रतिनिधीला दूषणे देणार्यांवर कठोर टीका करताना संबंधितांनी आधी स्वतःचे चेहरे आरशात पाहावे व नंतरच इतरांवर चिखलफेक करावी असा सल्ला मिकीसमर्थकांनी दिला. मिकींवरील नाहक आरोप म्हणजे आम्हा तमाम मतदारांचा अपमान आहे, असेही या समर्थकांनी कॉंग्रेसला सुनावले.
बाणावली - नुवे मतदारसंघ नागरिक समितीच्या झेंड्याखाली घेतलेल्या या पत्रपरिषदेला ऍड. बायलान रॉड्रिगीस, जिल्हा पंचायत सदस्य नेली रॉड्रिगीस, डॉमनिक गावकर, विल्फ्रेड डिसा, बेताळभाटी सरपंच मिंगेल परेरा, माजोर्डा सरपंच व्हिजिटीना डिसिल्वा, पंच कॅटरिना डिसोझा, नुवेच्या पंच फिला डीसा, जॉय कॉस्ता आदी मंडळी उपस्थित होती.
मिकींचा मंत्रिमंडळातील प्रवेश रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या कॉंग्रेसमधील गटाला व प्रामुख्याने मंत्री चर्चिल आलेमाव व बाबूूश मोन्सेरात यांच्यावर उपस्थितांनी टीकेचा भडिमार केला. मिकींना अपमानास्पद विशेषणे बहाल करण्याचा अधिकार त्यंाना आहे का, असा सवाल याप्रसंगी करण्यात आला. मिकींविरोधात षडयंत्र रचण्यात आले; पण अजूनही त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले नाही. ते दोषी ठरलेले नाहीत. मात्र सध्या मंत्रिमंडळात असेलेले अनेक जण ‘कॉफेपोसा’खाली दोन दोन महिने आग्वाद जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यांच्यावर तिरंगा पायाखाली तुडवल्याचा आरोप झाला आहे, इतरांवर पोलिस स्टेशनवर हल्ला केला यासारखे गंभीर आहेत. एका मंत्र्याच्या पुत्रावर तर रशियन अल्पवयीनावर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. हे लोक कोणत्या तोंडाने मिकींवर ठपका ठेवायला निघाले आहेत, असा सवाल याप्रसंगी करण्यात आला.
मिकी यांनी बेताळभाटीत गेल्या वर्षी व यंदा जो मेळावा भरविला त्यामुळे कॉंग्रेसचे नेते बिथरले आहेत. त्याच्या मनांत भय निर्माण झाले आहे. सत्ता नसताना जर हा माणूस इतके लोक जमवूं शकतो तर उद्या सत्ता मिळाल्यावर तो काय करेल या भीतीतूनच ही सारी मंडळी एकत्र आली आहेत. त्यांनी मिकींविरुद्ध दबावतंत्र सुरू केले आहे. मिकींना मंत्रिपद नाकारता येणार नाही. ते नाकारले तर त्याचे परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेनुसार मिकींना मंत्रिपद दिले नाही तर भविष्यातील कृती काय हे नंतर जाहीर केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. बाणावली व नुवे मतदारसंघातील पंचायत सरपंच, पंच तसेच अन्य मंडळी यावेळी मोठ्या संख्येने हजर होती. त्यात काही बिगर सरकारी संघटनांच्या पदाधिकार्यांचाही समावेश होता.
Saturday, 25 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment