Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 December 2010

‘सनबर्न’ पार्टीला अद्याप गृहखात्याचा परवाना नाही

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): कांदोळी समुद्रकिनार्‍यावर होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ पार्टीच्या आयोजनाला अद्याप गृहखात्याने परवानगी दिलेली नाही, अशी माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी दिली. दि. २७ ते २९ डिसेंबर या दरम्यान या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘‘माझ्यापर्यंत अद्याप या विषयीची कोणतीही फाईल आलेली नाही. त्यामुळे गृहखात्याच्या परवानगीशिवाय या पार्टीचे आयोजनच होऊ शकत नाही. समुद्रकिनार्‍यांवर होणार्‍या प्रत्येक पार्टीच्या आयोजनासाठी गृहखात्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे’’, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
या ‘सनबर्न’ पार्टीच्या आयोजकांनी पोलिस खात्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे पोलिस खात्याचे पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनीही स्पष्ट केले. ‘आयोजकांनी त्यांना परवानगी मिळाली आहे, अशा भ्रमात राहू नये; कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे परवानगी मिळेल, असे त्यांना वाटत असावे. मात्र पोलिस खात्याने त्यांना या पार्टीच्या आयोजनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. तरीही ही पार्टी झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू’,, असेही श्री. बस्सी म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी कांदोळी नागरिक मंचाने या पार्टीच्या आयोजनाला प्रखर विरोध केला होता. तसेच, या पार्टीच्या आयोजनासाठी गृहखात्याने परवानगी देऊ नये, अशी मागणीही केली आहे. या मागणीला रेईस मागूस नागरिक समिती व नेरुल नागरिक कृती समितीने पाठिंबा दिला आहे.
या पार्टीत मद्यधुंद होऊन धांगडधिंगाणा घातला जातो. तसेच, अमली पदार्थाचे सेवनही मोठ्या प्रमाणात करून सलग तीन दिवस अश्‍लील नृत्य केले जाते. यामुळे कांदोळी गावाचे नाव बदनाम होत आहे. गेल्या वर्षी नेहा बहुगुणा या तरुणीचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे या पार्टीच्या आयोजनाला स्थानिकांचा विरोध असल्याचे कांदोळी नागरिक मंचाचे निमंत्रक तुकाराम नाईक स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तीन दिवस चालणार्‍या पार्टीला अजून परवानाच मिळालेला नसला तरी सदर पार्टीत सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण तरुणींनी संकेतस्थळावर तिकिटे आरक्षित केली आहेत. तसेच, देशातील प्रसिद्ध ‘डीजे’ही या पार्टीत भाग घेणार आहेत. त्यामुळे परवानगी नसताना सदर पार्टी होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

No comments: