Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 December 2010

सन २०१२ पर्यंत राज्यात शंभर टक्के साक्षरता व वीजजोडणी

मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सन २०१२ पर्यंत शंभर टक्के साक्षरता आणि संपूर्ण राज्यात शंभर टक्के वीजजोडणी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली. ते आज मुक्तिदनाच्या सुवर्ण जयंती दिनानिमित्त कांपाल परेड मैदानावर मानवंदना स्वीकारल्यानंतर राज्याला उद्देशून बोलत होते. ‘गोयंकारपण’ आणि पर्यावरण सांभाळत विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, विविध खात्याचे मंत्री व उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक उपस्थित होते.
राज्यात १०० टक्के वीजपुरवठा करण्याची योजना यापूर्वीच सरकारने सुरू केली असून ज्या भागात वीजपुरवठा करणे शक्य नाही तेथे लोकांना सौरऊर्जेवर चालणार्‍या यंत्राचा पुरवठा केला जाणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले. लहान मुले बेघर राहू नये यासाठी ‘माय स्विट होम’ ही योजना यावेळी जाहीर करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांना मळणारे मानधन आता ५ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच, सरकारी नोकरीपासून वंचित राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना यावर्षा पर्यंत नोकरी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिस विकास सोसायटीला १ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, होम गार्ड आणि अग्निशमन दलाच्या सोसायटीला प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही श्री. कामत यांनी पुढे सांगितले.
यावेळी पोलिस अधीक्षक विश्राम बोरकर, सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस व गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांना मुख्यमंत्रिपदक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ३६ व्यक्तींचा आणि ४ विशेष व्यक्तीचा तसेच एका सामाजिक संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढून त्यांना गौरविण्यात आले. शेवटी ४ हजार विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

No comments: