बाजारातील १६ दुकाने खाक; दीड कोटींचे नुकसान
म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी)
म्हापसा मार्केटमध्ये सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत शकुंतला पुतळ्याजवळील १६ दुकाने जळून खाक झाली तर पाच दुकानांना बरीच झळ पोहोचली आहे. आगीत या एकवीस दुकानांचे मिळून अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
रात्री गस्तीवर असणार्या पोलिसांना म्हापसा मार्केटमधील शकुंतला पुतळ्याजवळील डांगी ऑप्टिशियन दुकानासमोर आग लागल्याचे समजताच त्यांनी ताबडतोब म्हापसा पोलिस स्थानकाला वर्दी दिली. तेथून अग्निशामक दलाला कळवण्यात आले. अग्निशामक दलाचा बंब त्वरेने मार्केटमध्ये पोहोचलाही; परंतु अगदीच अरुंद असलेल्या रस्त्यांमुळे प्रत्यक्ष आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यास त्यांना बरीच कसरत करावी लागली. बाजारात रस्त्यावर बसून विक्री करणार्यांंचे पेटारे, खाटा व अन्य सामान मध्येच असल्यामुळे हा बंब शकुंतला पुतळ्याजवळ ठेवावा लागला. दरम्यान, यावेळी आगीने असा काही रुद्रावतार धारण केला होता की, केवळ म्हापसा अग्निशामक दलाचा बंब ती विझवण्यासाठी अपुरा पडला असता. त्यामुळे पणजी, डिचोली, पेडणे, रेवोडा या ठिकाणाहूनही बंबांना पाचारण करण्यात आले. परंतु, आगीच्या ठिकाणी हे बंब थेट पोहोचू शकत नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला विलंब लागला व त्यामुळे नुकसानीचा आकडाही वाढला. तरीही दलाने कसोशीने प्रयत्न करून अन्य दुकानांना आगीपासून वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, डांगी चष्म्याच्या दुकानासमोरील झाडाच्या खाली असलेल्या दुकानात शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. या दुकानाच्या वरच्या बाजूला आडोशासाठी मेणकापड बांधण्यात आले होते. शॉर्ट सर्किट होताच या मेणकापडाने लगेचच पेट घेतला आणि आग सर्वत्र पसरली. या ठिकाणी अधिकतर रेडीमेड कपडे, प्लॅस्टिक चप्पल व फळ विक्रेत्यांची दुकाने आहेत. रेडीमेड कपड्यांच्या दुकानांत ही आग झपाट्याने पसरली व त्यात ती दुकाने पूर्णपणे खाक झाली. नाताळाचा सण तोंडावर आलेला असल्याने येथील दुकानदारांनी आपल्या दुकानांत माल भरून ठेवला होता. मात्र आगीने तो भस्मसात केला. दरम्यान, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, मुख्याधिकारी मधुरा नाईक, नगरसेवक गुरुदास वायंगणकर, रुपेश कामत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट, उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार शंखवाळकर माजी उपनगराध्यक्ष ऑस्कर डिसोझा यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या आगीत समीर ताहीर, शुभलक्ष्मी बोंद्रे, गजानन आरोलकर, दामोदर तिवरेकर, महेश धारगळकर, रवींद्र कामत, गुरुदास गडेकर, संजीव कुडतरकर, मुनीज बादशहा, उदय वेंगुर्लेकर, जयप्रकाश कामत, पांडुरंग राऊळ, अहमद मुल्ला, अकबर नारंगी, नदाब नारंगी, राजू कुडतरकर, शेख शमरुद्दीन, नूर लतीफ, अंकुश पार्सेकर, अब्दुल शेख, नजीर नारंगी यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या आगीत ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून त्वरित मदत मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. सरकारनेही या दुर्घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने मदत करावी, अशी मागणी येथे भेट दिल्यानंतर आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केली.
या संदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सदर दुकाने हटवून त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार पालिकेने चालवला होता व या बाबतीत दुकानदारांशी बोलणीही केली होती. पण दुकानदारांनीच नाताळाच्या सणानंतर आपण दुकाने खाली करू असे सांगितले होते. ही दुकाने हटवण्यासाठी त्यांना १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, असेही त्या म्हणाल्या. ऐन सणाच्या काळात घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खेदजनक प्रतिक्रिया नगराध्यक्ष कांदोळकर यांनी व्यक्त केली.
Tuesday, 21 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment