Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 24 December 2010

कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो रडवू लागला!

‘संपुआ’ सरकारविरोधात संतापाची तीव्र लाट
मुंबई, दि. २३
कांद्याने रडवल्यानंतर आता त्याची जागा टोमॅटोने घेतली आहे.
कारण, आजच्या घटकेला या लालबुंद भाजीसाठी किलोमागे येथील बाजारात किमान साठ रुपये मोजावे लागत आहेत आणि हे भाव लगेच कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृतवाखालील केंद्रातील ‘संपुआ’ सरकारविरोधात जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याने सगळ्यांचाच वांदा केला. भाकरीसोबत कांदा खाणार्‍या गरिबांपासून ते पावभाजी, वडा-पावसोबत तोंडी लावायला कांदा घेणार्‍या मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांनाच कांद्याचे भाव पाहून ङ्गिट् आली. या भाववाढीवरून प्रचंड गदारोळ झाल्यावर आता टोमॅटो मध्यमवर्गीयांवर रुसला आहे.
टोमॅटोचे नवीन पीक बाजारात येण्यास काही आठवडे तरी लागतील. पावसामुळे आधीचे पीक ङ्गुकट गेले आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हं आहेत, असं व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. टोमॅटोचे पीक ङ्गक्त महाराष्ट्रातच होत नाही. शेजारील कर्नाटक, गुजरात, पंजाब या राज्यांत यंदा टोमॅटोचं समाधानकारक पीक आल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकरी हेही सांगतात की, जेव्हा ग्राहकएका किलोमागे साठ रुपये मोजत असतो तेव्हा दलाल मात्र शेतकर्‍याला किलोमागे अवघे पाच ते सात रूपये देत असतो. अर्थात कांदा उत्पादक शेतकरीही हीच व्यथा मांडतात. आमच्या हातावर किलोमागे जेमतेम तीन ते सात रुपये टेकवतात आणि बाजारात हा कांदा अव्वाच्या सव्वा भावाने विकतात.
जेव्हा कांदा उत्पादन भरपूर असते तेव्हा दलाल भाव पाडून आमच्याकडून माल घेतात आणि जेव्हा उत्पादन कमी होते, तेव्हाही दलाल सांगतील तोच भाव आम्ही स्वीकारतो. कारण कांदा नाशवंत असल्यामुळे आणि आमच्याकडे त्याचा साठा करण्याची सोय नसल्यामुळे आम्ही नेहमीच घाट्यात असतो असे शेतकरी सांगतो.
यंदा अवकाळी पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत, असे सांगून दलाल भरमसाठ भावाने या भाज्या विकत आहेत. प्रत्यक्षात कांद्यासारखे पदार्थ दलाल आणि व्यापारी साठवून ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत, असा बळिराजाचा आरोप आहे.

No comments: