Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 December 2010

गोव्यात एकही ड्रग माफिया नाही!

गृहमंत्र्यांच्या दाव्याने उपस्थित पडले चाट
"गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. असल्यास तुम्ही दाखवून द्या, आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करतो!" - इति: रवी नाईक
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): "गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. असल्यास तुम्ही दाखवून द्या, आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करतो!" राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी आज समस्त गोवेकरांना असे धडधडीत आव्हान दिले आणि यावेळी इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच तोंडात बोटे घातली. गेल्या वेळी अशाच प्रकारचे ‘विनोदी’ वक्तव्य करताना गोव्यात अमली पदार्थच नसल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला होता आणि पोलिस खात्याने त्याच रात्री लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला होता. यामुळे ड्रग माफियांचे पोलिस अधिकार्‍यांशी असलेले साटेलोटेही उघडकीस आले होते.
मंगळवारी आल्तिनो येथील राखीव पोलिस दलाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी वरील हास्यास्पद वक्तव्य केले. यावेळी पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बस्सी व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. राज्यात दर दिवशी अमली पदार्थाची तस्करी व विक्रीची प्रकरणे उघड होत असताना गृहमंत्र्यांनी असे छातीठोक विधान केल्याने यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना हसावे की रडावे असा प्रश्‍न पडल्यावाचून राहिला नाही.
काही आमदार विधानसभेत विनाकारण पोलिसांवर आरोप करून त्यांच्या नीतिधैर्याचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत, असाही आरोप श्री. नाईक यांनी यावेळी केला. मात्र हा आरोप करताना, काही महिन्यांपूर्वीच पोलिस आणि ड्रग्ज माफियांचे अभद्र साटेलोटे उघडकीस आले होते आणि त्यानंतर पाच पोलिसांवर निलंबित होण्याची पाळी येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला होता, हे गृहमंत्री इतक्यातच कसे काय विसरले, असे प्रश्‍नचिन्हही उपस्थितांच्या चेहर्‍यावर झळकले.
‘‘गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. मी स्वतः पोलिस अधिकार्‍यांसह रात्रीच्या वेळी किनार्‍यांवर फेरफटका मारून पाहणी केली आहे. या ड्रग माफियांची येथे पाळेमुळे रुजणार नाही यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेतो आहोत’’, असेही श्री. नाईक यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, गृहमंत्री रवी नाईक यांचा मुलगा रॉय नाईक याचे ड्रग माफियांशी घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप ‘अटाला’ या इस्रायली ड्रग माफियाची मैत्रीण लकी फार्महाऊस हिने केला होता. परंतु, अद्याप तिचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे, २००८ साली हणजूण येथे खून झालेल्या स्कार्लेट किलिंगची आई फियोना हिनेही रॉय नाईक याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने गेल्या विधानसभा अधिवेशनात हे प्रकरण अतिशय तडफेने लावून धरले होते व या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र याप्रकरणी पाच पोलिसांना तडकाफडकी निलंबित करणार्‍या गृहखात्याने या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या होत्या. या सर्व प्रकरणांतील धूर अजूनही निघत असताना गृहमंत्री राज्यात ड्रग माफियाच नाही, असे विधान करून आपण अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहेत की, गोमंतकीयांची फसवणूक करत आहेत, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘‘आम्ही ड्रग व्यवसायाचा कणा मोडलेला आहे. अमली पदार्थाविरोधात सरू केलेली ही मोहीम अधिकच तीव्र करू’’, असे गृहमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

No comments: