मिकींच्या समावेशास मुख्यमंत्रीही अनुत्सुक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)
‘‘दिल्लीत राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशन संध्याकाळी उशिरा संपले व त्यामुळे गोव्यातील राजकीय गुंत्याबद्दल चर्चा करण्याची संधीच मिळाली नाही. बघू! संधी मिळालीच तर या बाबतीत श्रेष्ठींशी बोलू’’, अशा शब्दांत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून प्रदेश कॉंग्रेस तथा खुद्द मुख्यमंत्री कामत हे मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास अनुकूल नाहीत हेच यावरून अखेर स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवून जुझे फिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनाही आपापल्या मंत्रिपदाचे राजीनामे देण्याची सूचना केली आहे. दरम्यान, या उभयतांनी हा आदेश न जुमानता थेट श्रेष्ठींनाच आव्हान दिले आहे. कॉंग्रेस मंत्री व आमदारांनीही या दोघांना मंत्रिमंडळातून वगळण्यास हरकत घेतली आहे. मिकी पाशेको हे उपद्रवी असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास अनेकांनी विरोध दर्शवल्याने मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या विषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे आज सूप वाजले; मात्र गोव्यातील नित्याच्याच बनलेल्या या घटनेकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मुख्यमंत्री कामत यांच्यासाठीही ही गोष्ट श्रेष्ठींसमोर नेणे कठीणच बनले आहे व त्यामुळे त्यांनीही घाई न करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
आपण आजच गोवा सदनात पोहोचलो. कॉंग्रेसचे अधिवेशन इथून २० किलोमीटर अंतरावर होते व त्यामुळे आज कुणाचीच भेट घेणे शक्य झाले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकाराकडे बोलताना सांगितले. श्रेष्ठींची कधी भेट घेणार असा सवाल केला असता, ‘‘बघू, जसा वेळ मिळतो त्याप्रमाणे ठरवू’’, असे म्हणून त्यांनी या विषयाला जास्त महत्त्व देत नसल्याचाच आविर्भाव घेतला. मुख्यमंत्री या विषयी बी. के. हरिप्रसाद तथा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर तसेच अन्य काही मंत्री व आमदारही दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत व त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेण्याचीच मागणी लावून धरण्याचे ठरवले आहे, अशीही खबर मिळाली आहे.
उद्यापर्यंत फैसला होणार
मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळातील वर्णी ही काळ्या दगडावरची रेघ आहे व कॉंग्रेसकडून कितीही धडपड केली गेली तरी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांचा आदेश मुख्यमंत्री कामत यांना मान्य करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतील मिकी समर्थक पदाधिकार्यांनी दिली. मिकी पाशेको यांना टाळण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी आघाडीतून फारकत घेण्याचीही तयारी पक्षाने ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ पर्यंत हा गुंता नक्कीच सोडवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Tuesday, 21 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment