पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
ख्रिसमस (नाताळ) आणि नववर्षाच्या तोंडावर मुंबईत ‘लष्कर ए तोयबा’चे चौघे दहशतवादी घुसल्याच्या वृत्तामुळे खबरदारी म्हणून गोव्यात सुरक्षेबरोबरच किनारी भागातही गस्त वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, नौदल आणि तटरक्षक दलाला अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली.
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात विविध ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी निमलष्करी दलाच्या चार कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत. ही माहिती पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. दहशतवादी हल्ल्याचा धोका नसला तरी सुरक्षेत वाढ करण्याची सूचना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी सुरक्षेसाठी गोव्यात आलेले केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या गोव्यात असून त्या नववर्षाच्या आगमनापर्यंत गोव्यात असणार आहेत. आजपासूनच त्यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच, किनारी भागातही शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत.
ख्रिसमस सणावेळी घातपात घडवून आणण्यासाठी चौघे दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी जाहीर केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. किनारी भागात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सावधगिरी बाळगली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment