बाबासाहेब पुरंदरे व प्रभाकर सिनारींचे अनुभवकथन
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): देशहित समोर ठेवून निःस्वार्थीपणे कार्य करणार्या कर्मवीरांच्या घाम व रक्ताच्या थेंबांतूनच इतिहासाची निर्मिती होते. प्रभाकर सिनारी यांचे कार्य एका निधड्या छातीच्या गौरवशाली स्वातंत्र्यवीराचे आहे. त्यांचा सशस्त्र लढा चित्रपट व माहितीपटांतून लोकापुढे येणे गरजेचे आहे. गोवा सरकारने तसा प्रयत्न का केला नाही, अशी खंत इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली. केरी सत्तरी येथील स्वामी विवेकानंद इतिहास संशोधक मंडळातर्फे गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून गोवा दमण व दीव स्वातंत्र्य लढ्यात ५२ वर्षांपूर्वी बरोबरीने काम केलेले बाबासाहेब पुरंदरे व प्रभाकर सिनारी यांच्या अनुभव कथनाचा तथा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम राज्य वस्तू संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी श्री. सिनारी व प्रकट मुलाखत घेणारे प्रा. भूषण भावे व्यासपीठावर उपस्थित होते. दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची ५२ वर्षांनी एकत्रित भेट झाल्यानंतर दोघांनीही गोवा मुक्तिलढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला व अनेक प्रसंगाबद्दल सविस्तर माहिती दिली.
\u2355?शिवचरित्राकडे वळण्याबाबत बोलताना श्री. पुरंदरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजांच्या घराण्याचे व आपल्या घराण्याचे जवळचे सबंध होते. त्यांचे वडील शहाजी राजे व आई जिजाई यांनी लिहिलेली पत्रे आपल्या बालपणी आपणास घरी मिळाली, त्यांच्या अभ्यास करताना शिवछत्रपतींवरील पुस्तके वाचत गेलो. आपल्या लढाऊ व देशप्रेमी मनाने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास सुरू केला. गोवा मुक्तिलढ्यातील सहभागाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणाले की, नगर हवेली सशस्त्र लढ्यात आपण प्रभाकर सिनारींच्या नेतृत्वाखाली भाग घेतला. गोव्याच्या सीमेवरील अनेक गावात स्वातंत्र्यसैनिकांसोबत भ्रमंती केली. यावेळी सिनारींचे धैर्य व शौर्य आपल्या मनावर कायमचे ठसा उमटवून गेल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा मुक्तीच्या वेडानेच सशस्त्र लढा उभारला : सिनारी
पारतंत्र्यात असताना अवती भोवती पोर्तुगीजांकडून केले जाणारे अत्याचार पाहून मन पेटून उठले व लोहियांच्या मुक्तिलढ्याच्या रणशिंगाने त्यात चेतना जागवली. गोवा स्वतंत्र केल्याशिवाय सहजपणे प्राण सोडायचा नाही या एकाच निर्धाराने अनेक वेळा पोर्तुगीजांच्या तावडीतून निसटलो. किल्ल्यावरून उड्या मारल्या, तळ्यात रात्री काढल्या, घर, संसार, शिक्षण याकडे दुर्लक्ष करून अनेक यातना सहन केल्या, गोळ्या झेलल्या, असे निधड्या छातीच्या सिनारी यांनी सांगितले.
या वेळी गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला युवकांना संदेश देताना बाबासाहेब म्हणाले की, निराश होऊ नका आहे, ज्या विभागात काम करता ते नेकीने करा, देशभक्तीचा विसर न पडता व्यसन, भ्रष्टाचार, दुराचार न करता सत्कर्म करीत बेचैनीत जगा व चैनीत मरून अमर व्हा!
तर प्रभाकर सिनारी यांनी स्वातंत्र्यात जगायला मिळणे हे भाग्य असून स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी सतर्क राहा, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवून देशहित साधण्यास युवकांनी सहभाग दाखवावा असे आवाहन केले.
या प्रसंगी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते श्री. सिनारी यांचा तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कांता घाटवळ यांच्या हस्ते श्री. पुरंदरे यांचा गौरव करण्यात आला. स्वागत विवेकानंद इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष वरद सबनीस यांनी केले. ओळख सुधीर सबनीस यांनी केली तर सूत्रनिवेदन प्रा. पौर्णिमा केरकर यांनी केले. स्नेहा सुतार हिने ईशस्तवन सादर केले. सचिन मदगे यांनी आभार व्यक्त केले.
Sunday, 19 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment