पणजी, शिरोड्यासह
फातोर्ड्यात कांदाविक्री
पणजी ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत भाजप कार्यालय, नावेलकर आर्केड, डॉ. आत्माराम बोरकर रोड.
शिरोडा ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत शिरोडा बाजार.
फातोर्डा ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत अमूल आईस्क्रीम पार्लर, मल्टिपर्पज हायस्कूल, बोर्डा.
पणजी, दि. २३
गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारला उघडे पाडण्यासाठी आणि प्रामुख्याने सामान्य जनतेला दिलासा मिळावा याकरता भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने केवळ तीस रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार उद्या २४ डिसेंबर रोजी पणजी, शिरोडा व फातोर्डा मतदारसंघांत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कांदा विकण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ पणजी, शिरोडा व फातोर्डा मतदारसंघातील सर्व जनतेने उठवावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होऊ लागले आहेत. कांद्यासारखी वस्तू दुर्मीळ झाल्यामुळे खायचे काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. मात्र गोव्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने फलोत्पादन खात्याअंतर्गत रास्त दरात कांदे उपलब्ध करण्याची फक्त घोषणाबाजीच चालवली आहे. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अशीच प्रचंड भाववाढ झाली होती. ती शंभर दिवसांत कमी करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले होते. मात्र, दिवसेंदिवस महागाईच्या झळा वाढतच चालल्या आहेत. भाजपने त्याविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर भाजपने गोमंतकीयांना नारळ आणि पामतेल या वस्तू स्वस्त दरात विकल्या होत्या. त्यानंतर कोठे सरकारला जाग आली व आम आदमीस या वस्तू रास्त दरात विकणे भाग पडले होते. आतादेखील केंद्र व राज्यातील सरकार दलालांची भर करण्यातच धन्यता मानत असल्याचे संतापजनक चित्र दिसून येते. त्यामुळेच ठोस कृती करून भाजपने या सरकारला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे.
Friday, 24 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment