Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 December 2010

‘एनएसजी’तर्फे गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (‘एनएसजी’) पाच सदस्यीय पथक काल १० रोजी गोव्यात दाखल झाले. कॅप्टन सुरज रे लाला यांच्या नेतृत्वाखालील हे पथक येथील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून त्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसारच गोव्यातील सुरक्षेसंदर्भाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आज ‘एनएसजी’ च्या पथकाने पर्वरी मंत्रालय व सचिवालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. गोवा पोलिस सुरक्षा विभागाचे निरीक्षक किरण पडवळ हे त्यांच्यासोबत होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर किनारी राज्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता व ही जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा दलाकडे सोपवली आहे. गोव्यासह महाराष्ट्र, गुजरात व दमण व दीव आदी भागांचा यात समावेश आहे.
दरम्यान, उद्या १२ रोजी या पथकाकडून राजभवन तथा विविध किनारी भागांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. गोवा हे दहशतवादी संघटनेच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अनेकदा सांगितले आहे. त्या अनुषंगानेच गोव्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याच्या दृष्टीने या पथकाची ही भेट असल्याचे सांगण्यात आले.
राजभवनची सुरक्षा गोवा पोलिसांकडे!
राजभवनाच्या सुरक्षेसाठी सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. ही तुकडी हटवून यापुढे राजभवनाच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिसांकडे देण्याचा विचार सुरू आहे. गोवा पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलाकडे ही कामगिरी सोपवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाकडूनही यासंदर्भात आपली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली जाणार आहे. राज्यपालांच्या सुरक्षेतही कपात करण्याचा प्रस्ताव असून त्यांना सध्या लागू असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा काढून घेण्याचे ठरले आहे, असेही कळते. दरम्यान, सध्या गोव्यात नाताळ व नवीन वर्षांचा उत्साह असल्याने तोपर्यंत सध्याची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. पुढील वर्षांच्या प्रारंभी ही सुरक्षा गोवा पोलिस खात्याच्या ताब्यात येण्याचा संभव आहे.

No comments: