पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गोव्याच्या राजकारणाची शिस्तच हरवल्यामुळे जो तो सत्तेच्या मागे धावून स्वार्थासाठी गोव्याच्या हिताआड येणार्या गोष्टींना प्रोत्साहन देताना दृष्टीस पडतो आहे. आपण या पुढील वर्षभरातील काळात गोव्याच्या राजकारणाला शिस्त आणण्याबरोबरच पुढील वर्षी होणार्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कार्यतत्परता वाढवण्यावर भर देणार आहोत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
आज आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी श्री. पर्रीकर यांना त्यांच्या वाढदिनाच्या संकल्पाबाबत विचारले असता त्यांनी वरील निवेदन केले. गोव्याच्या राजकारणात अंदाधुंदी वाढलेली आहे व त्यामुळेच सर्वसामान्य जनता राजकारण्यांबद्दल तिरस्करणीय वक्तव्ये करताना दिसते आहे. हे सारे बदलून गोव्यातील लोकांच्या हिताचे राजकारण करण्याची गरज असून येथील राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्यावर आपला भर असेल. तसेच, विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांना कार्यतत्पर करण्यात येणार असून लोकांच्या इच्छेप्रमाणे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे पर्रीकर म्हणाले.
पणजी महापालिकेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की, पणजीतील लोक समंजस आहेत; त्यांनी गेल्या पाच वर्षांत सत्ताधार्यांनी कसा धुमाकूळ घातलाय त्याचा अनुभव घेतलेला आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराची जाणीव पणजीतील मतदारांना असल्याने पुढील महापालिका निवडणुकीत निश्चितच सत्ताबदल होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या कालच्या बेताळभाटी येथील कार्यक्रमातील घोषणेविषयी पर्रीकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘नो कॉमेंटस्’ एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली. तो त्या पक्षाचा निर्णय आहे व अन्य पक्षाच्या खासगी मामल्यात आपण कधीच हस्तक्षेप करत नाही, असे ते म्हणाले.
Tuesday, 14 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment