पार्टी परवानगीबाबत प्रशासन अनभिज्ञ
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गेली अडीच वर्षे बंद पडलेला हडफडे येथील कथित ‘क्लब क्युबाना’ पुन्हा एकदा संगीत रजनी पार्ट्यांनी गजबजणार आहे. येत्या नवीन वर्षांच्या निमित्ताने हा ‘नाईट क्लब’ सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून प्रशासकीय यंत्रणा मात्र त्याबाबत अद्याप अनभिज्ञ असल्याची खबर मिळाली आहे.
हडफडे येथील ‘क्लब क्युबाना’ हा संगीत रजनी पार्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. हा क्लब बेकायदा कार्यरत असल्याची याचिका हेमंत शिरसाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. या क्लबच्या कारभाराबाबत अनेक गैरप्रकार चौकशीत आढळून आल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशावरून हा क्लब बंद करण्याचा अंतरिम आदेश जारी करण्यात आला होता. दरम्यान, हा क्लब पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या क्लबचे मालक डेनियल शाह यांनी अलीकडेच ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्क संकेतस्थळावर नवीन वर्षांच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १ जानेवारी २०११ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार्टी आयोजित केल्याची जाहिरात केली आहे. ’’ Club Cubana is not open....Yet! Only on New Year Eve - a grand Party!,” असे ‘फेसबुक’ वरील या जाहिरातीत म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पार्टीबाबत अद्याप प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे.बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्टीबाबत आपल्याला अद्याप कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनीही या पार्टीबाबत पोलिस स्थानकाकडे कोणतीही प्रस्ताव सादर झाला नाही, असे सांगितले. नाईट पार्टीबाबत एखादा प्रस्ताव सादर झाला तर तो गृह खात्याकडे पाठवला जातो व गृह खातेच अशा पार्टींना परवानगी देण्याचा निर्णय घेते, असेही ते म्हणाले. दरम्यान, या पार्टीबाबत थेट गृह खात्याकडेही अर्ज सादर केला जाऊ शकतो. अलीकडेच गृह खात्याकडून दोन ‘सेटर्डे नाईट मार्केट’ साठी परवाना दिल्याचे प्रस्ताव पोलिस स्थानकाला कळवण्यात आले होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
हडफडेचे सरपंच आग्नेलो डिसोझा यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता ‘क्लब क्यूबाना’ सुरू करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. उच्च न्यायालयाने हा क्लब पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याचे कारण सांगून या क्लबच्या सूत्रांनी पंचायतीकडे संपर्क साधला आहे,असेही ते म्हणाले. दरम्यान, नवीन वर्षांच्या पार्टी आयोजनाबाबत मात्र पंचायतीला अद्याप काहीही कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत सादर करा व नंतरच पुढील निर्णय घेऊ,असे पंचायतीकडून त्यांना सांगण्यात आल्याची माहिती सरपंच डिसोझा यांनी दिली.
याप्रकरणी काही विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा क्लब शेत जमिनीत उभारण्यात आला आहे व सध्या नव्याने तयार करण्यात येणार्या प्रादेशिक आराखड्यात ही जमीन बिगरशेतीत रूपांतरित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी न्यायालयाकडे सादर झालेल्या कागदपत्रांनुसार हा क्लब उभारण्यात आलेले बांधकाम हे फार्महाऊस म्हणून उभारण्यात आले असून त्याचा केवळ राहण्यासाठी वापर करण्याची अट आहे. जिल्हाधिकार्यांनी वितरित केलेल्या सनद आदेशात या जागेचा बिगरशेतीसाठी वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. तसा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेण्याची अट घातली आहे. न्यायालयाने या क्बलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करताना या ठिकाणी संगीत रजनी पार्ट्या आयोजित करण्यासही मज्जाव केला होता,अशी माहितीही मिळाली आहे.
Monday, 13 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment