पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
कोलवाळ कोमुनीदाद घोटाळा प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव या दोघांनाही त्यावर जाहीर वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ४ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून किंवा लेखी स्वरूपात या अवमान याचिकेला उत्तर देण्याचे आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी दिले आहेत.
थिवी येथे श्री. हळर्णकर यांच्या मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत चर्चिल यांनी हळर्णकर यांच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यात आलेली तक्रार बनावट आणि राजकारणातून प्रेरित असल्याचा दावा केला होता. सदर प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी असताना अशा प्रकारचे वक्तव्य मंत्री आलेमाव यांनी केल्याचे हा न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा करून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जाची दखल घेऊन आलेमाव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर, सदर सभेचे आयोजन या प्रकरणात प्रतिवादी असलेले नीळकंठ हळर्णकर यांनी केल्याने त्यांच्यावरही अवमान याचिका सादर केली आहे.
मंत्री हळर्णकर यांनी कोमुनिदाद जमीन एकदम मुबलक दरात आपल्या ट्रस्टसाठी घेतल्याचा आरोप करून त्यांच्यावर काशिनाथ शेटये, डॉ. केतन गोवेकर यांनी तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीची नोंद न केल्याने भ्रष्टाचार विरोधी पथकाचे निरीक्षक नीलेश राणे आणि दक्षता विभागाचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याविरोधात अवमान याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
थिवी येथे झालेल्या जाहीर सभेत चर्चिल यांनी मंत्री हळर्णकर यांचे जोरदार समर्थन करून त्यांच्याविरोधात न्यायालयात करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचा दावा केला होता. त्यांचे हे वक्तव्य वर्तमानपत्रातूनही प्रसिद्ध झाले आहे. त्याचे कात्रण जोडून श्री. शेटये व डॉ. गोवेकर यांनी न्यायालयात हा अवमान याचिका सादर केली आहे.
Saturday, 18 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment