ट्रक कलंडला; सुदैवाने कसलीही हानी नाही
वास्को, दि. १३ (प्रतिनिधी): ३०० घरगुती गॅस सिलिंडर घेऊन येणारा ट्रक कुठ्ठाळी ˆ वास्को महामार्गावर उलटून एका सिलिंडरमधून वायुगळती होऊ लागल्याने त्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि, महामार्गावर निर्माण झालेला हा धोका वास्को व वेर्णा अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन दूर केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रस्त्यावर पडलेल्या सिलिंडरपैकी गळती लागलेला सिलिंडर या जवानांनी त्वरित दूर केल्यानंतर शेकडो नागरिकांचा जीव भांड्यात पडला.आज दुपारी ३.३० च्या सुमारास सदर घटना घडली. कुंडई येथील औद्योगिक वसाहतीतील ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ (एच.पी) व्यवस्थापनातून ३०० सिलिंडर घेऊन येणारा ट्रक (क्रः जीए ०२ टी ८९७८) अचानक कुठ्ठाळी ˆ वास्को महामार्गावर मधोमध उलटला. त्यामुळे आतील सर्व सिलिंडर रस्त्यावर फेकले गेले. सदर घटनेची माहिती वेर्णा व वास्को अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर पडलेल्या सर्व सिलिंडरांवर पाणी मारण्यास सुरुवात केली. तसेच तेथे असलेल्या सर्व लोकांना व वाहनांना तेथून हटवले. यानंतर सर्व सिलिंडरांची तपासणी करण्यात आली. मग वायुगळती झालेला सिलिंडर त्यांनी ताब्यात घेतला.
या अपघातात ट्रक चालक हल्लप्पा नाईक (वयः ४५, राः माशेल) जखमी झाल्याने त्याला त्वरित बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वास्कोत असलेल्या ‘गोमंतक गॅस एजन्सी’साठी हा साठा आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कुठ्ठाळी जंक्शनपासून थोड्याच अंतरावर (वास्कोच्या दिशेने) सदर अपघात घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला याचा त्रास सोसावा लागला. अपघात घडल्यानंतर सुमारे तीन तासाने (६.३० च्या सुमारास) ‘क्रेन’ च्या मदतीने उलटलेला ट्रक तेथून हटवण्यात आला. तसेच दुसर्या ट्रकात, रस्त्यावर पडलेले सिलिंडर भरून वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करण्यात आला. वेर्णा पोलिसांनी, ट्रकचे ‘स्टीअरिंग’ जाम झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले.
अपघातस्थळी वेर्णा अग्निशामक दलाचे प्रमुख एस.व्ही.पाळणी व वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख बॉस्को जॉर्ज यांनी हजर राहून जवानांना मार्गदर्शन केले. वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. उपनिरीक्षक सुशांत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सुरू आहे.
Tuesday, 14 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment