गिरीश ओक यांचा मनमोकळा संवाद
पणजी, दि. १२ (शैलेश तिवरेकर): प्रायोगिक नाटक म्हणजे कलाकार दिग्दर्शकाबरोबरच प्रेक्षकालाही आव्हान असते. ते तशाच पद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचल्यास त्याचे सोने होते अन्यथा त्याची माती व्हायला वेळ लागत नाही, असे मराठी रंगभूमीवरील दिग्गज नाट्यकलाकार डॉ. गिरीश ओक यांनी आज (दि.१२) सांगितले.
डॉ. ओक म्हणाले की, आज व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात तसा काही फरक राहिलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आजचे प्रेक्षक केवळ विनोदी नव्हे तर वैचारिक नाटकही त्याच आवडीने पाहतात. त्यामुळे स्पर्धात्मक नाटकांचे अनेक प्रयोग होताना दिसतात. आज अनेक युवक या क्षेत्राकडे वळताना दिसतात. विविध विद्यालयांतून प्रशिक्षणही घेतात, परंतु त्यातील अधेर्र्अधिक पडद्याआड जातात. या तरुणांनी स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी काय करावे यावर सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नाट्यकलेत स्वतःला टिकवायचे असल्यास भरपूर मेहनत घेणे हाच रामबाण उपाय आहे.
‘तो मी नव्हेच’, ‘यू टर्न’, अशा सरस ५० हुन अधिक नाटकांतून गाजलेले डॉ. गिरीश ओक ‘तुझे आहे तुझ्यापाशी‘ या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकात भूमिका करत असून त्यानिमित्त ते गोव्यात आले असता त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
नाट्यकलेविषयी कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेता नागपूर येथे महाविद्यालयीन काळात असताना विविध नाट्य आणि एकांकिका स्पर्धांंच्या माध्यमातून आपण इथपर्यंत मजल मारली. सुरुवातीला काही काळ डॉक्टरकीचा सराव केला परंतु त्याच्यात मन रमेना म्हणून गाव सोडून मुंबईला आलो. वैद्यकी सोडून नट व्हायला जातो म्हणून लोकांना आश्चर्य वाटले. १९७७ ते ८५ पर्यंत नाटके केली. मग मध्यंतराच्या काळात वाटले की, सगळे सोडून पुन्हा गावाला जाऊन डॉक्टरकीचा सराव करावा. परंतु आज मी समाधानी असून कला क्षेत्रात टिकून राहण्याचा त्यावेळचा माझा निर्णय खरोखरच बरोबर होता हे आता जाणवते, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. डॉ. ओक यांनी आत्तापर्यंत सुमारे ३० मालिका आणि काही मोजक्या चित्रपटांतूनही भूमिका केल्या. आजच्या युगातील एक अष्टपैलू कलाकार विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होता. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यातही वेगळाच आनंद वाटला.
डॉ. ओक दिग्दर्शकाबाबत म्हणाले की, नाटक हे कलाकारांचे माध्यम असले तरी पहिले दोन प्रयोग हे दिग्दर्शकाच्या हातात असतात. म्हणूनच एकंदरीत नाटकाचा तोल व्यवस्थित सांभाळण्यासाठी दिग्दर्शकांच्या मताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण कलाकार हा आपल्या व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून नाटकाकडे पाहत असतो तर दिग्दर्शक संपूर्ण नाटकाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो. आज नाटक हा पूर्णवेळ व्यवसाय असला तरी काही नाटके अशी असतात की त्याकडे केवळ पैशांसाठी म्हणून पाहिले जात नाही. तर अर्थ आणि स्वार्थ अशा दोन्ही गरजा पुरविणारी नाटके असतात. ज्या नाटकांना आपण अजरामर नाटक म्हणू अशा नाटकांतून काम करताना एक आत्मसमाधान मिळत असते.
आज मराठी कलाकार म्हणतो की, मराठी चित्रपटात नवनवीन युवा निर्माते दिग्दर्शक आधुनिक विचार घेऊन येत असल्याने मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. याबाबत ते म्हणाले की आपण चित्रपटांच्या फंदात जास्त पडलेलो नाही त्याची कारणे वेगवेगळी आहेत परंतु ही गोष्ट खरी आहे की चित्रपटांच्या निर्मितीला जरी चांगले दिवस आले असले तरी त्यांना अजूनही म्हणावी तशी चित्रपटगृहे उपलब्ध होत नाहीत. गोव्यातील चित्रपटगृहात तर मराठी चित्रपट चाललेले दिसतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याविषयी न बोललेलेच बरे. सध्या नवीन काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, साम टीव्ही, स्टार टीव्ही या चॅनलवर मालिका सुरू असून ‘यु टर्न’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ ही दोन नाटके चालत आहेत.
Monday, 13 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment