पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
राजधानी पणजीत होणारी वाहनांची कोंडी आणि अव्यवस्था यावर आज विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी पोलिस वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त व सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकार्यांमार्फत शहराची पाहणी करून अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या.
सायंकाळच्या वेळी क्रुजवर जलसफरीला जाणार्या पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहनांची कोंडी होत असल्याने नव्या मांडवी पुलाखालून या पर्यटकांना जाण्यासाठी विशेष मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती श्री. पर्रीकर यांनी दिली. येत्या आठवड्यापासून हा मार्ग सुरू होणार आहे. याचे काम जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे, हॉटेल फिदाल्गो चौक, कोकणी अकादमी, नवा पाटो पूल येथील वळणावरील रस्ताही वाढवण्यात येत आहे. या बदलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा प्रश्न मिटणार असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
दर दिवशी नव्या पाटो पुलावरून पणजी शहरात ६५ हजार वाहने प्रवेश करतात. तर, जलसफरीसाठी सुमारे दहा हजार पर्यटक रस्ता ओलांडतात. यावेळी एक मिनिटही वाहतुकीच्या वेगात खंड पडल्यास मोठी रांग याठिकाणी लागते. त्यामुळे रस्ता न ओलांडता हे पर्यटक नव्या मांडवी पुलाखालून अत्यंत सुरक्षितपणे जलसफरीसाठी मांडवी तटावर जाऊ शकतात, असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून हा मार्ग करण्याचा प्रस्ताव होता. गेल्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे.
त्याचप्रमाणे, दिवजा सर्कलच्या बाजूला आणि मांडवी पुलाच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पार्किंग क्षेत्र म्हणून अधिसूचित केले जाणार आहे. याठिकाणी पर्यटकांना घेऊन येणार्या ४० बसेसना पार्किंग करण्याची जागा उपलब्ध आहे.
तसेच, हॉटेल फिदाल्गो चौकात रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करून ठेवली जात असल्यानेही वाहनांची कोंडी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या वळणावर एकही वाहन उभे करू देऊ नका अशी सूचना वाहतूक पोलिसांना केली आहे. येत्या काही दिवसांत वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर वाहतूक पोलिस अधीक्षक अरविंद गावस, महापालिका आयुक्त एल्वीस गोम्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.
Saturday, 18 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment