लालूंचा कंदील विझला; कॉंग्रेसचा सपशेल धुव्वा
नवी दिल्ली/पाटणा, दि. २४ - बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप- जदयु युतीने या आधीचे सर्वच विक्रम मोडीत काढत तीन चतुर्थांश एवढे भरभक्कम बहुमत प्राप्त करत विरोधी पक्ष असलेल्या राजद - लोजपा युती आणि कॉंग्रेस पक्षाचा सुपडा अक्षरशः साफ केला आहे.
शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी घोषित झालेल्या निकालांपैकी २०६ जागांवर विजय प्राप्त करत जदयु - भाजप आघाडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. राजद - लोजपा युतीला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले असून, यावेळी स्वतंत्रपणे मैदानात उतरलेल्या कॉंग्रेसला आपली गेल्यावेळची कामगिरीसुद्धा कायम ठेवता आली नाही. त्यांना केवळ चार जागांवरच विजय संपादन करता आला. इतर पक्षांना ८ जागी विजय मिळाला आहे.
२००५ च्या निवडणुकीत जदयु - भाजपला १४३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र आघाडीने सगळ्याच राजकीय पंडितांची भविष्यवाणी खोटी ठरवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
या निवडणुकीत जदयुने १४१ आणि आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भाजपने १०२ जागा लढवल्या होत्या. या दोन्ही पक्षांची विजयाची टक्केवारी बघितली असता हा विजय ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. याआधी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने १८५ जागा पटकावून एक विक्रम स्थापन केला होता. जदयु - भाजप आघाडीने यावेळी २०० जागांचा टप्पा ओलांडून सर्वच विरोधी पक्षांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना सोनेपूर आणि राघोपूर या दोन्ही मतदारसंघांत दारुण पराभव पत्करावा लागल्याने राजदला फारच मोठा धक्का बसला आहे.
कॉंग्रेसला या निवडणुकीत मतदारांनी चांगली चपराक लगावली असून, केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवरून पंतप्रधान, सोनिया आणि राहुल गांधी यांनी नितीशकुमारांवर जोरदार हल्ला केल्यानंतरही पक्षाला आपले मागचे आकडेसुद्धा कायम ठेवता आले नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याच्या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना जोरदार धक्का बसला आहे. भाकपला एक आणि अपक्ष उमेदवारांना तीन जागा मिळाल्या आहेत.
Thursday, 25 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment