मडगावातील महामार्ग रुंदीकरण विरोधी सभेत जाहीर इशारा
मडगाव, दि. २२ (प्रतिनिधी): सभागृह समितीने आपल्या २४ नोव्हेंबरच्या बैठकीत गोमंतकीयांच्या हिताचे निर्णय घ्यावेत; अन्यथा त्यानंतर आंदोलन तीव्र करून सरकारवर "हल्लाबोल' केला जाईल, असा रोखठोक इशारा महामार्ग रुंदीकरण विरोधात आज येथील लोहिया मैदानावर झालेल्या जाहीर सभेत दिला गेला.
महामार्ग रुंदीकरण आराखडा मार्गबदल कृती समितीने बोलावलेल्या या सभेला गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून मोठी उपस्थिती लाभली होती. विविध पक्षांचे नेतेही व्यासपीठावर विराजमान झाल्याने या सभेला सर्वपक्षीय स्वरूप आले होते. महामार्गाची फेरआखणी करावी, त्यासंदर्भात संबंधितांशी बोलणी करावी, एकंदर कामकाजात संपूर्ण पारदर्शकता असावी, महामार्ग लोकवस्तीपासून दूर असावा, पर्यावरणाची किमान हानी होईल याची दक्षता घेतली जावी, पुरातन तसेच धार्मिक स्थळांना धक्का पोहोचवला जाऊ नये, महामार्ग व्हावाच पण सर्वसामान्यांसाठी तो हानिकारक असू नये व म्हणूनच त्यावर टोल असू नये, महामार्गाचे हस्तांतरण केले जाऊ नये; त्या ऐवजी आवश्यक तेथेच रुंदीकरण केले जावे, आराखडा तयार करताना स्थानिक तज्ज्ञ व सर्वेक्षक घेतले जावेत, अशा शिफारशी सभेत करण्यात आल्या व त्याला अनुसरून सभागृह समितीने निर्णय घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. गोमंतकीयांना विकास हवाच आहे पण विकासाच्या नावाखाली विध्वंस अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी सभेचा समारोप करताना संबंधितांना बजावले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव व कॉंग्रेस सरकारवर घणाघाती टीका झालेल्या या सभेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, माजी मंत्री मिकी पाशेको व माथानी सालढाणा, डॉ. ऑस्कर रिबेलो, ऍड. सतीश सोनक, ऍड. राधाराव ग्रासियस, माजी आमदार फातिमा डीसा, पॅट्रिसिया पिंटो, राजू मंगेशकर, नाझारेथ पिंटो, ऍलन कॉस्ता, मेहबूब खान, संदीप कांबळी, सिद्धार्थ कारापूरकर व इतरांची भाषणे झाली.
बहुतेक सर्वच वक्त्यांनी सरकारवर महामार्ग रुंदीकरणाबाबत ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा, त्याच्याकडे निश्र्चित असा कोणताच कार्यक्रम नसल्याचा व त्यामुळे बाहेरील राज्यांतील बिल्डरांच्या हितासाठीच ते वावरत असल्याचा आरोप करून अशा सरकारला जन्माची अद्दल घडविण्याची गरज प्रतिपादिली.
सुवर्णमहोत्सवी वर्षात नवा स्वातंत्र्यलढा ही दुर्दैवी बाब : पर्रीकर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत गोमंतकीयांना नवा स्वातंत्र्यलढा सुरू करावा लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे व स्थानिक सरकारच्या नालायकपणामुळेच ही स्थिती उद्भवल्याचे सांगितले. हा लढा कोणा एकाचा नाही तर तमाम गोमंतकीयांचा आहे; कारण राज्य चोरांच्या हातात गेलेले असून तमाम गोवेकरांसाठी ते संकट असल्याचे सांगितले. सध्याच्या मार्गाचे किरकोळ प्रमाणात रुंदीकरण करून व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून समस्या सोडविता येण्यासारखी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सरकार टोलबाबत दिशाभूल करत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. विधानसभेत आपल्या पक्षाने धारेवर धरल्यावरच सभागृह समिती स्थापन केलेली असली तरी गेली साडेतीन महिने तिची बैठकच बोलावली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता बोलावलेल्या समितीच्या बैठकीत गोमंतकीयांच्या भावना मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. राधाराव ग्रासियस यांनी भाजपबाबत केलेल्या निवेदनाला अनुलक्षून गोवा गोमंतकीयांसाठीच असावा हे गोवा भाजपचे धोरण असून या गोमंतकीयांत हिंदूंबरोबरच ख्रिस्ती, मुस्लिम व अन्य धर्मीयांचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मिकी पाशेको यांनी आपल्या भाषणात लोक योग्य माणसांना सत्तेप्रत नेत नाहीत व त्यांतूनच त्यांच्यावर अशा प्रकारे पस्तावण्याची पाळी येते असे सांगून यापुढे तरी याबाबतीत काळजी घ्या, असा सल्ला दिला. गोवा महामार्ग कसा असावा तेच ठाऊक नसलेल्यांनी आता तरी कर्नाटक वा महाराष्ट्र या शेजारी राज्यांत जाऊन लोकवस्तीला झळ न पोचता महामार्ग कसा नेला जातो त्याचे अवलोकन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राधाराव ग्रासियस यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे पुरते वस्त्रहरण करताना अशी माणसे मंत्रिपदावर पोहोचली की असेच व्हायचे, असे सांगून याला लोकच जबाबदार असल्याचे सांगितले. चर्चिल यांनी आता तरी कॉंग्रेसमधून बाहेर पडून प्रायश्चित्त घ्यावे व गोव्याच्या भल्यासाठी नव्या राजकारणाला सुरुवात करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी गेल्या पाच वर्षांत प्रत्येक दिवशी गोमंतकीय या ना त्या कारणास्तव रस्त्यावर उतरलेला आहे व या सरकारची तीच मिळकत असल्याचे उपहासाने सांगितले. आज जमीन ही सोन्याची खाण बनलेली असून सर्वांचे लक्ष त्यासाठी गोव्याकडे लागले आहे; महामार्ग रुंदीकरणामागेही तेच लक्ष्य आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. गोव्यातील राजकारणावर टीका करताना येथे एक नव्हे तर अनेक मुख्यमंत्री आहेत व त्यामुळे कारभार दिशाहीन अवस्थेत चालला आहे असे ते म्हणाले.
लोकांच्या घरावर बुलडोझर चालवू पाहणाऱ्या दिगंबर कामत व चर्चिल आलेमांव यांनी प्रथम स्वतःची घरे पाडली तर आपण त्यांना त्याची भरपाई देण्यास तयार असल्याचे फातिमा डीसा यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
सभेत सासष्टीतील वर्गीकृत जमातींतील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. वक्त्याच्या भाषणाअखेर व अधूनमधून ढोलताशे वाजवून दाद दिली जात होती. मध्यंतरी मेणबत्त्या पेटवून मारिया यांनी "ओ माये, ओ माये' अशी प्रार्थना म्हटली तेव्हा केवळ सभाच नव्हे तर संपूर्ण परिसरच हेलावून गेला.
सूत्रसंचालन झरीना डिकुन्हा यांनी केले तर सुनील देसाई यांनी समारोप केला.
Tuesday, 23 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment