Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 26 November 2010

पणजी बाजारातील पाच दुकाने खाक

४ लाखांची हानी, सुमारे ५ लाखांची मालमत्ता वाचवली
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): आज सकाळी पालिका बाजारात लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली. यात एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर, ५ लाख ८० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यास अग्निशमन दलाला यश आले. सकाळी ७.४० वाजता ही घटना घडली.
अग्निशमन दलाला माहिती मिळताच अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. यावेळी आग विझवण्यासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पणजी अग्निशमन स्थानकाचे अधिकारी एस. व्ही. नाईक यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, पालिका बाजारातील नरेश माने यांच्या नावावर असलेल्या क्रमांक ५३, ५४ या दुकानाला आग लागली. फर्निचर आणि स्वयंपाकाच्या वस्तूंचे हे दुकान असून या आगीत दुकानाचे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. सर्वो फर्नांडिस यांच्या बारचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले तर, २ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. ईनासियो फर्नांडिस यांच्या ताव्हेर्न बारचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले तर, १ लाख ५० हजार रुपयाची मालमत्ता वाचवण्यात आली. आनंद डोंगरीकर यांच्या केश कर्तनालयाचे ३० हजारांचे नुकसान झाले तर ८० हजार रुपयांची मालमत्ता वाचवली गेली. दया कारापूरकर यांच्या दुकानाचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून १ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्याची आल्याची माहिती यावेळी दलाने दिली.
सकाळी मच्छीविक्री करण्यासाठी आलेल्या लोकांनी माने यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे पाहिले व याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली. याबरोबर दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. श्री. माने यांचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments: