Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 November 2010

पर्यटन टॅक्सी परमिट शुल्कवाढ रद्द करा


वाहतूक खात्यावर धडक देणार



पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- वाहतूक खात्याने पर्यटन टॅक्सी वाहनांच्या परमिट शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीच्या निषेधार्थ राज्यातील शेकडो पर्यटन टॅक्सी व्यावसायिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. ही वाढ निषेधार्ह आहे, असे सांगून उत्तर गोवा पर्यटन टॅक्सी मालक संघटनेतर्फे २२ रोजी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात वाहतूक खात्यावर धडक मोर्चा नेण्याचाही संघटनेचा विचार आहे.
वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी १८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व प्रकारच्या पर्यटन वाहनांवरील परमिट शुल्कात भरमसाठ वाढ जाहीर केली आहे. ही वाढ अजिबात समर्थनीय नाही. केवळ महसूलप्राप्तीचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयात टॅक्सी व्यावसायिकांचा अजिबात विचार झालेला नाही. राज्य वाहतूक प्राधिकरणावर (एसटीए) आपा तेली, लवू मामलेदार, नरेश कडकडे व खुद्द संचालक अरुण देसाई हे सदस्य आहेत. किमान हे लोक स्थानिक असल्याने त्यांना स्थानिक पर्यटन टॅक्सी व्यावसायिकांची परिस्थिती अवगत असेल, अशी भावना होती. या लोकांकडूनही या गोष्टीचा गांभीर्याने विचार झाला नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत संघटनेचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर यांनी व्यक्त केली. वाढती स्पर्धा व त्यात महागाई यामुळे आधीच संकटात सापडलेला हा व्यवसाय सरकारच्या अशा निर्णयांमुळे धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मुळात पर्यटन टॅक्सीच्या परमिट शुल्कात वाढ करण्याबाबत सुरुवातीला जी अधिसूचना जारी झाली त्याला संघटनेतर्फे हरकत घेण्यात आली. या शुल्कात कपात करावी तसेच ८०० सीसी क्षमतेच्या वाहनांसाठी पर्यटन परवाना रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. संघटनेच्या एकाही मागणीची दखल सरकारने घेतली नाहीच वरून शुल्कात अधिक वाढ केली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा. प्रत्यक्षात पर्यटन टॅक्सी व्यावसायिक कोणत्या परिस्थितीत व किती अडचणी व समस्यांना सामोरे जाऊन या व्यवसायात टिकून आहेत, याची सखोल माहिती सरकारने मिळवावी व मगच या जाचक निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे. या शुल्कवाढीविरोधातील आंदोलनाची दिशा येत्या आठवड्यात ठरवली जाईल,असेही श्री.वेंगुर्लेकर म्हणाले.

No comments: