Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 November 2010

"पीसीए' मैदानावर साकारला गोव्याचा ऐतिहासिक विजय


शदाबच्या मायाजालात पाहुणे फसले - झारखंडचा डाव आणि १२७ धावांनी पराभव


पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - सामनावीर शदाब जकातीने रचलेल्या मायाजालात झारखंडचे अर्धा डझन खेळाडू सर्वस्वी फसले आणि यजमान गोव्याने पाहुण्या झारखंडचा एक डाव आणि १२७ धावांनी प्रचंड पराभव करून पर्वरी क्रिकेट अकादमीच्या (पीसीए) मैदानावरील शुभारंभी रणजी सामन्यात विजयी पताका झळकावली. शदाबने ६ तर अमित यादवने ३ गडी बाद करताना झारखंडचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी अवघ्या १८९ धावांत गुंडाळला आणि गोव्याच्या रणजी इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला गेला.
पर्वरी क्रिकेट अकादमीचे मैदान पहिल्याच सामन्यात गोव्यासाठी भलतेच फलदायी ठरले. पहिल्या दोन्ही सामने अनिर्णित राखताना प्रतिस्पर्ध्यांना पहिल्या डावातील आघाडीचे गुण बहाल करणाऱ्या गोव्याने या घरच्या मैदानावर मात्र आपली कामगिरी कमालीची उंचावली आणि बोनस गुणासह विजय मिळवून रणजी प्लेट ए गटातील आपले आव्हान जिवंत राखले. आता हैदराबाद आणि त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास गोव्याचा बाद फेरीचा मार्ग खुला होऊ शकतो.
पहिल्या दिवसापासूनच गोव्याने सामन्यावर वर्चस्व राखले होते. फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून ५८३ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर काल झारखंडचा पहिला डाव २६७ धावांत संपुष्टात आला होता व गोव्याने त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता. डावाचा पराभव टाळण्यासाठी ३०३ धावांचे आव्हान घेऊन काल मैदानात उतरलेल्या झारखंडच्या सलामीवीरांनी बिनबाद १४ अशी मजल मारली होती. या धावसंख्येवरून त्यांनी आज पुढे खेळायला सुरुवात केली. मनीष वर्धन आणि सचिन प्रसाद यांनी सावधपणे डाव सुरू केला. ही जोडी जम बसवत असतानाच शदाबने मनीष वर्धन (२३) याच्या यष्ट्या उध्वस्त करत गोव्याला आज पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सचिन प्रसाद आणि इशांक जग्गी यांनी ३६ धावांची भागीदारी रचली. एका बाजूने सलग मारा करणाऱ्या अमित यादवने सचिन प्रसाद (२८) याला पायचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर रॉबिन डिसोझाने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही झारखंडचा "स्टार' कर्णधार सौरभ तिवारी (१२) याला रात्राच्या जागी यष्टीरक्षण करणाऱ्या राहुल केणीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि झारखंडच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. पुढच्याच षटकात अमित यादवने भरात असलेल्या इशांक जग्गी (२४) याला पायचीतच्या जाळ्यात ओढल्यामुळे झारखंडचा पराभव समोर दिसू लागला होता. उपहारापूर्वीच झारखंडने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते व यावेळी त्यांची धावसंख्या १०१ झाली होती.
उपहारानंतर शदाबने आपले मायाजाल पसरवायला सुरुवात केली आणि झारखंडचे खेळाडू त्यात लीलया अडकले. शदाबने आधी दीपक चौगुले (१४) याच्या यष्ट्या वाकवल्या व नंतर शिव गौतम (२) याला केणीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. आत्मविश्वासाने खेळत असलेल्या राजीव कुमार (२३) याला एका अप्रतिम चेंडूवर चकवून शदाबने झारखंडला सातवा धक्का दिला तर कुलदीप शर्मा (२) याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सगुण कामतच्या हाती झेलबाद केले. ही पडझड होत असताना वरुण ऍरन (नाबाद ३९) याने मात्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवला होता. परंतु, त्याला एकाही फलंदाजाची साथ मिळू शकली नाही. राहुल शुक्ला (३) हा शदाबचा सहावा बळी ठरला. त्यानंतर अमित यादवने शेवटच्या समर काद्री याचा शून्यावर त्रिफळा उडवून झारखंडचा डाव १८९ धावांत संपवला.
सामना संपल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांनी सर्व खेळाडूंचे खास कौतुक केले. त्यानंतर झालेल्या औपचारिक सामनावीर पुरस्काराची घोषणाही त्यांनीच केली. यावेळी बोलताना बीसीसीआयचे सामनाधिकारी के. के. शर्मा यांनी पर्वरी क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानाची विशेष स्तुती केली. उत्तरप्रदेशने जसे भारताला अनेक खेळाडू दिले त्याचप्रमाणे गोव्यातूनही अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
धावफलक ः
गोवा पहिला डाव ५८३
झारखंड पहिला डाव २६७ आणि दुसरा डाव सर्वबाद १८९
मनीष वर्धन त्रि. जकाती २३, सचिन प्रसाद पायचित अमित यादव २८, इशांक जग्गी पायचित अमित यादव २४, सौरभ तिवारी झे. केणी गो. रॉबिन डिसोझा १२, दीपक चौगुले त्रि. जकाती १४, राजीव कुमार त्रि. जकाती २३, शिव गौतम झे. केणी गो. जकाती २, वरुण ऍरोन नाबाद ३९, कुलदीप शर्मा झे. सगुण कामत गो. जकाती ४, राजीव शुक्ला झे. केणी गो. जकाती ३, समर काद्री त्रि. अमित यादव ०, अवांतर १७.
गडी बाद क्रम ः १-४६, २-८२, ३-१०१, ४-१०१, ५-१२३, ६-१३१, ७-१५१, ८-१६७, ९-१८०, १०-१८९.
गोलंदाजी ः शदाब जकाती २७-१२-५५-६, शेरबहादूर यादव १०-४-१०-०, विद्युत शिवरामकृष्णन १-०-७-०, सौरभ बांदेकर ७-३-२६-०, रॉबिन डिसोझा ११-३-१८-१, अमित यादव २२-६-५६-३, रीगन पिंटो २-०-६-०.शदाब जकाती ः आमच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी तशी सोपी नक्कीच नव्हती. त्यामुळे आम्ही अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्याचेच धोरण ठेवले व त्यात आम्हांला यश आले. या विजयामुळे आम्ही पुन्हा शर्यतीत आलो आहोत. पुढील दोन्ही सामन्यात अशीच कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
बॉक्स२ - सगुण कामत (कर्णधार) - या विजयामुळे आम्ही अतिशय आनंदित झालो आहोत. पहिल्या दोन्ही सामन्यांत पहिल्या डावात आलेल्या अपयशामुळे आम्हांला महत्त्वाचे गुण गमवावे लागले होते. मात्र या सामन्यात सर्वच फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचेच आम्ही ठरवले होते. आमची ही योजना फलंदाजांनी कमालीची यशस्वी ठरवली. त्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत हा विजय साकारला.

No comments: