Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 27 November 2010

लोकभावनेच्या उद्रेकापूर्वी चोरट्यांना अटक करा : पर्रीकर

पर्वतावरील चोरीप्रकरणी पोलिस महासंचालकांकडे मागणी
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): पारोडा पर्वतावरील चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. दोन दिवसांपूर्वी या मंदिरात झालेल्या धाडसी चोरीमुळे भाविक संतप्त बनले आहेत. त्यामुळे लोकभावनेचा उद्रेक होण्यापूर्वी पोलिसांनी चोरांना ताबडतोब जेरबंद करावे, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांची भेट घेऊन केली.
पोलिस मुख्यालयात झालेल्या या चर्चेवेळी पर्रीकरांसमवेत शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, चंद्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष व्यंकटेश प्रभुदेसाई, सचिव कृष्णा गावस, सिद्धार्थ कुंकळकर व आत्माराम बर्वे उपस्थित होते.
मडगाव शहर परिसरातच अधिक प्रमाणात चोऱ्या का होतात, याचाही शोध पोलिसांनी घ्यावा, अशी सूचना श्री. पर्रीकर यांनी यावेळी केली. गेल्या पाच वर्षांत ९५ टक्के चोऱ्या, घरफोडी आणि मूर्ती मोडतोड प्रकरणे ही मडगाव पासून २० किलो मीटरच्या परिसरात घडलेली आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यांत गुंतलेल्या टोळीचा ताबडतोब पर्दाफाश करून तिला अटक करण्याची मागणीही यावेळी श्री. पर्रीकर यांनी केली.
केवळ सुरक्षा रक्षक तैनात केल्याने चोऱ्यांचे प्रमाण घटणार नाही. त्यासाठी विदेशांत आणि मोठमोठ्या बॅंकांत सहसा वापरण्यात येणाऱ्या विद्युत "अलार्म'चीही मदत घेतली जावी. कोणीही चोरीचा प्रयत्न केल्यास हा "अलार्म' थेट पोलिस नियंत्रण कक्षात वाजतो. त्याने अशा चोरीच्या प्रकारांवर बराच आळा बसू शकतो, अशीही मौलिक सूचना त्यांनी यावेळी केली.
पणजीत गुंडगिरी खपवून घेणार नाही!
दरम्यान, परवाच युथ कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पणजीत शहरातील एका दुकानात घुसून सदर दुकानाची मोडतोड केलेल्या प्रकरणावर बोलताना श्री. पर्रीकर म्हणाले की, या मोडतोड प्रकरणात गुंतलेल्या दोषींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. पणजी मतदारसंघाचा आमदार या नात्याने शहरात कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. पोलिसांनी केवळ एकच बाजू लक्षात घेऊन कारवाई केली आहे. त्यामुळे मोडतोड करणाऱ्या व्यक्तींनाही अटक केली जावी, असे ते म्हणाले.

No comments: