Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 24 November 2010

बिहारचा आज फैसला

पाटणा, दि. २३ : अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २४३ मतदारसंघांची मतमोजणी सुरू होणार आहे. याचबरोबर बिहारमधील बांका येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्याच होणार आहे, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी कुमार अंशुमली यांनी सांगितले.
एकूण ४२ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होईल. विशेष करून जिल्हा मुख्यालयी ही मतमोजणी होईल व त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकाल देण्यासाठी निवडणूक आयोगाची वेबसाईटही तयार आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी जे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते त्यांच्या भाग्याचा निकाल उद्या लागणार असून यात प्रामुख्याने मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासह नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. कॉंग्रेस हाच एकमेव पक्ष असा होता की त्याने बिहारमधील सर्वच्या सर्व म्हणजे २४३ जागी उमेदवार उभे केले होते. त्यापाठोपाठ बसपाने २३९ जागी उमेदवार उभे केले होते. सत्तारूढ जदयू १४१ जागी तर त्याचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपने १०२ जागी उमेदवार उभे केले आहेत. राजदने १६८ जागी तर लोजपाने ७५ जागी उमेदवार उभे केले आहेत.
मंत्रिमंडळाची शेवटची बैठक
दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली व सध्या अस्तित्वात असलेली विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या विधानसभेची मुदत उद्या संपत आहे. राजभवनाकडून उद्या या संदर्भात औपचारिक घोषणा झाल्यानंतरच विधानसभा बरखास्त होईल.

No comments: