नागपूर, दि. २३ : रसाळ संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरात दर्दी रसिकांच्या साक्षीने आज महेंद्रसिंग धोनीच्या शिलेदारांनी डॅनियल व्हेटोरीच्या न्यूझीलंड संघाची अक्षरशः पिसे काढली. तिसरी आणि अंतिम क्रिकेट कसोटी एक डाव व १९८ धावांनी जिंकून टीम इंडियाने धमाल केली. तीन सामन्यांची ही मालिका यजमानांनी १-० अशी खिशात टाकली. नागपुरचा जावई असलेला राहुल द्रविड या सामन्याचा मानकरी ठरला, तर अष्टपैलू भज्जीने म्हणजेच हरभजनसिंगने मालिकावीर हा बहुमान पटकावला.
त्याचबरोबर चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सोमदेव देवबर्मन याने सुवर्णपदके पटकावण्याचा धडाकाच लावला आहे. त्याने काल सनमसिंगच्या साथीत पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. पाठोपाठ आज (मंगळवारी) पुरुष एकेरीत त्याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याचे आव्हान सरळ सेटस्मध्ये उद्ध्वस्त करून आणखी एकदा सुवर्णमय कामगिरी बजावली. त्यामुळे टीम इंडियाबरोबरच सोमदेव याच्यावरही साऱ्या देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Wednesday, 24 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment