Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 24 November 2010

येडियुराप्पांसंबंधी भाजपचा आज निर्णय

नवी दिल्ली, दि. २३ : भूखंड गैरव्यवहारात दोषी असल्याचा आरोप झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी अखेर भारतीय जनता पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे मंगळवारी सकाळी जाहीर केले. रात्री उशिरा पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांच्यासंबंधीची निर्णय बुधवारी दुपारी ११ वाजता जाहीर करण्यात येईल असे सांगितले.
आज दिवसभरात आपण सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन कर्नाटकातील विद्यमान परिस्थितीची माहिती देणार आहोत, असे सांगून येडियुराप्पा म्हणाले, की येत्या एका महिन्यात राज्यात जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना येडीयुरप्पा म्हणाले, ""मी कोणतीही चूक केलेली नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश मला शिरसावंद्य असेल. पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची काल भेट घेऊन त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली असून, आज आणखी काही नेत्यांची भेट घेणार आहे.''
केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलेले नाही याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले, की कथित भूखंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. पद्मराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला ११० ते १२० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि अन्य नेत्यासाठी मार्ग मोकळा करावा, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथसिंह यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे.

No comments: