'देशप्रेमी नागरिक समिती'चा सज्जड इशारा
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): पोर्तुगिजांच्या राजवटीचे उदात्तीकरण करून कोणीही देशप्रेमी गोमंतकीयांच्या भावनांशी खेळू नये. या नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिल्यास राज्य सरकार, फुंदासांव ओरियंत संस्था आणि गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्यांना जन्माची अद्दल घडवू, असा सज्जड इशारा आज "देशप्रेमी नागरिक समिती'चे निमंत्रक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला. सरकारला आणि या पोर्तुगीजधार्जिण्या लोकांचा ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही आव्हानही प्रा. वेलिंगकर यांनी दिले.
२५ नोव्हेंबर हा गोव्यासाठी काळा दिवस म्हणून आज पाळण्यात आला. गोव्यातील जनतेवर पोर्तुगिजांच्या पाशवी अत्याचाराचा स्मृतिदिन म्हणून पणजी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी आझाद मैदानावर आल्फोन्सो द आल्बुकर्क यांच्या पुतळ्याला चपलांच्या माळा घालून तो जाळण्यात आला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत यावेळी प्रा. वेलिंगकर बोलत होते. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात तीनशेच्या आसपास देशप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला होता.
व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दत्ता भि. नाईक, मयेचे आमदार अनंत शेट, कोकण प्रांत महाविद्यालय प्रमुख प्रा. रत्नाकर लेले, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री राजू वेलिंगकर, जागरण गटाचे गोवा प्रमुख आनंद शिरोडकर, गोवा युवा मंचाचे प्रमुख ऍड. ह्रदयनाथ शिरोडकर, युवा मोर्चाचे आत्माराम बर्वे, सिद्धेश नाईक व गिरिराज पै वेर्णेकर यावेळी उपस्थित होते.
पोर्तुगिजांनी गोव्यावर केलेल्या आक्रमणाला पाचशे वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार गोव्यात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करू पाहत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे स्वप्नही सरकारने पाहू नये. हा विचार सरकारने त्वरित रद्द करावा, यातच सर्वांचे हित असल्याचेही श्री. वेलिंगकर यावेळी म्हणाले.
गोव्यात पोर्तुगीज राजवटीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी चालायची. या तस्करीच्या हप्त्यांचा एक वाटा पोर्तुगीज राज्यपालालाही जात होता. असा या भ्रष्ट आणि अघोरी पोर्तुगिजांचा धिक्कार केला पाहिजे, असे दत्ता भि. नाईक म्हणाले. पोर्तुगिजांचाच काळ बरा होता असे अजूनही कोणाला वाटत असल्यास त्यांनी आपल्या रक्ताची चाचणी करून घ्यावी, असा खोचक सल्ला यावेळी श्री. नाईक यांनी दिला.
पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाला असला तरी अद्याप मये मतदारसंघ पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झालेला नाही, असे मत यावेळी मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यांची जराही चाड असल्यास या स्थलांतरित मालमत्ता या कायद्यापासून मयेवासीयांना मुक्त करावे, अशी मागणी श्री. शेट यांनी यावेळी केली.
पोर्तुगिजांनी गोव्यातील लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले. फुंदासांव ओरियंत संस्थेला येणाऱ्या पैशांची दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी आणि पोर्तुगीज सरकारने गोव्यातील जनतेवर केलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल लेखी माफी मागवावी, अशी मागणी राजू वेलिंगकर यांनी केली.
यावेळी ह्रदयनाथ शिरोडकर व आत्माराम बर्वे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन आनंद शिरोडकर यांनी केले तर, आभार विलास सतरकर यांनी मानले. गिरिराज पै वेर्णेकर यांनी ठरावाचे वाचन केले तर, सर्वांना हात उंचावून त्याला मान्यता दिली.
--------------------------------------------------
देशप्रेमी नागरिक समितीने घेतलेले पाच ठराव
१. पोर्तुगिजांनी विकृतीकरण केलेल्या सर्व गावांची, रस्त्यांची, सार्वजनिक जागांची नावे हटवून त्यांना भारतीय राष्ट्रपुरुषांची नावे द्यावीत.
२. पोर्तुगीज वकिलात त्वरित गोव्यातून काढून दिल्लीला हालवावी.
३. पुन्हा पुन्हा पोर्तुगीज साम्राज्यवादाचा व साम्राज्यवाद्यांचा गोव्यात होत असलेला उदोउदो, सार्वजनिक तसेच सरकारी पातळीवर बंद करावा.
४. फुंदासांव ओरियंत या पोर्तुगाली साम्राज्यवादाचे उदात्तीकरण करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करावी.
५. गोवा मुक्त होऊन ४९ वर्षे लोटूनही पोर्तुगीज वारसदाराच्या देशद्रोही कारवायांच्या छायेत असलेली मये गावातील "स्थलांतरित मालमत्ता' त्वरित मुक्त करावी.
Friday, 26 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment