Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 26 November 2010

पोर्तुगिजांच्या 'एजंटां'विरोधात आघाडी उघडण्याची गरज : करमली

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी): दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, माजी खासदार एदुआर्द फालेरो व पणजीच्या महापौर कारोलीन पो हे पोर्तुगिजांचे "एजंट' असून देशविरोधी कृती करत असलेल्या या लोकांच्या विरोधात आघाडी उघडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली यांनी केले.
गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल सुरू झाल्यास आज पाचशे वर्षे पूर्ण होत असल्याने गोव्यातील शेकडो राष्ट्राभिमानी लोकांनी हा दिवस "पोर्तुगाली वसाहत विरोधी दिन' म्हणून पाळला. यानिमित्त आज संध्याकाळी वास्कोच्या विद्याधीराज भवनात आयोजित कार्यक्रमात श्री. करमली बोलत होते.
या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्यवीर टी. बी. कुन्हा स्मारकाला "जलाभिषेक' व "साग्रेस' जहाज आल्याने "सागरी शुद्धीकरण', असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शेकडो देशाभिमानी लोकांनी उपस्थिती लावली.
आजचा दिवस हा गोमंतकीयांच्या दृष्टीने काळा दिवस असून पुन्हा असा दिवस येऊ नये म्हणून सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अजूनही येथे पोर्तुगिजांचे काही "एजंट' वावरत आहेत. साग्रेस जहाजाला येथे येण्यास सरकारने बंदी घालण्याची गरज होती. मात्र त्यांनी तसे केले नाही व म्हणूनच आता या सर्वांना धडा शिकवण्याची गरज उत्पन्न झाली आहे, असे श्री. करमली पुढे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले इतिहास अभ्यासक श्रीकांत रामाणी, डॉ. प्रदीप मस्के, काशिनाथ मयेकर, नंदकुमार कामत, वास्कोतील समाजसेवक उदय नगर्सेकर व अन्य मान्यवरांची पोर्तुगीजधार्जिण्यांचा निषेध करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन सतीश सोनक यांनी केले.

No comments: