शिरगावच्या खाणविरोधी लढ्याला संपूर्ण पाठिंबा
खडपवाडा-चोडण भाविकांची घोषणा
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): शिरगाव गावातील खाण उद्योगावर कुणाचाही निर्बंध राहिलेला नाही व त्यामुळे हा गावच सध्या संकटात सापडला आहे हे इथे भेट देणारा कुणीही सांगू शकेल. मोजकेच का होईना, परंतु हा धोका लक्षात घेऊन शिरगावातील ज्या काही लोकांनी खाण उद्योगाविरोधात लढा उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. शिरगाववासीयांच्या या खाणविरोधी लढ्याला खडपवाडा - चोडण येथील देवीच्या भक्तमंडळींचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी घोषणा दयानंद वळवईकर यांनी केली.
शिरगावातील खाण विरोधी वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. गेल्याच आठवड्यात खाण खात्यातर्फे मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनीला "लीझ' दिल्याची अधिसूचना जारी झाली व या "लीझ' करारात धार्मिक ठिकाणे व अनेकांची घरे असल्याने येथील लोक आक्रमक बनले आहेत. सर्वे क्रमांक ५३ अंतर्गत अतिशय महत्त्वाचे धार्मिक स्थळ या "लीझ' करारात येते. या "लीझ'करारातून हा सर्वे वगळण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता उलट या जागेवर खाण येणारच नाही, असा दावा काही लोक कोणत्या आधारावर करीत आहेत, असा सवाल दिलीप भास्कर गावकर यांनी केला आहे. आत्तापर्यंत शिरगाववासीयांना अंधारात ठेवून अनेकांनी खाण कंपनीशी संधान बांधले हे लोकांना ठाऊक आहे. आता शिरगावच्या अस्तित्वावर शेवटचा घाव घालण्याचे कारस्थान सरकारकडून रचले जात असताना तरी या लोकांनी दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये, असे आवाहन श्री. गावकर यांनी केले. शिरगावच्या रक्षणासाठी पुढे आलेल्या आपल्याच बांधवांवर टीका करणारे हे लोक खाण कंपनीच्या विरोधात चकार शब्द काढीत नाहीत, यावरून कुणाचे लागेबांधे कुणाशी जुळलेले आहेत, याची चांगलीच कल्पना शिरगाववासीयांना आली आहे, असा टोलाही श्री. गावकर यांनी हाणला.
दरम्यान,शिरगाव बचावच्या आवाहनाला विविध भागांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचेही श्री. गावकर म्हणाले. चोडण गावातील खडपवाडा येथील भक्तगणांनी या लढ्यात शिरगाववासीयांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यात कृष्णा फोंडेकर, सदानंद हळदणकर, सुरेंद्र मांद्रेकर, अनिल सावंत, ज्योत्स्ना नाईक, नरहरी साळगावकर, ह्रदयनाथ वळवईकर, दीपक वळवईकर, विनायक हळदणकर, विराज हळदणकर, रूपेश नाईक, दीपकुमार मापारी, रामदास मापारी, सुहास मांद्रेकर, शीतल नाईक, सोनिया नाईक, गुरुदास कुंडईकर, परेश नाईक, साईश मांद्रेकर, सूरज नाईक, बाबूली कळंगुटकर, नरसिंह नार्वेकर आदींचा समावेश आहे. शिरगाव हे एक पवित्र व जागृत धर्मस्थळ आहे व त्यामुळे या स्थळाचे रक्षण करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. शिरगावच्या सर्व भक्तगणांची ताकद एकवटली तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Wednesday, 24 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment