Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 27 September 2010

"अटाला' इस्रायलमध्ये!

"रेड कॉर्नर'चा उडाला फज्जा

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोव्यातून पळालेला पोलिस ड्रग माफिया प्रकरणातील मुख्य साक्षीदार यानीव बेनाईम ऊर्फ "अटाला' हा इस्रायली येथील रिशॉन या शहरात लपून बसल्याची माहिती एका इस्रायली संकेतस्थळावर आणि वर्तमानपत्रांत झळकल्याने गोवा पोलिसांच्या "रेड कॉर्नर' नोटिशीचा फज्जा उडाला आहे. रेड कॉर्नर नोटीस बजावलेली असताना "अटाला' इस्राईलमध्ये पोचल्याने पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
"अटाला' इस्त्रायलमध्ये असलेल्याची उघडकीस आलेल्या माहितीवर गोवा पोलिस खात्यातील कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. खात्याचे पोलिस प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकणार नाही.
''www.Ynet.com'' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार "अटाला' हा भारतातून पळून येण्यास यशस्वी ठरला असून सध्या तो रिशॉन -लेटझीयोन या शहरात राहत आहे. रिशॉन हे इस्राईलमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अटाला हा पोलिस ड्रग माफिया प्रकरणातील मुख्य साक्षीदार असून जून २०१० मध्ये तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तो बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. गेल्या एका आठवड्यापूर्वी इस्रायली वर्तमानपत्रावर ही माहिती उघडकीस आली आहे की अटाला इस्रायली मधील रिशॅन या शहरात आहे. अटाला याला एका आठवड्यापूर्वी इस्राईलमध्ये पाहिल्याचे त्याच्या एका मित्रानेही सांगितल्याने या संकेतस्थळाच्या प्रतिनिधीला दुजोरा मिळाला आहे.
"कुठेही गेला असेल तेथून पत येणारच' अशा प्रकारचे वक्तव्य अटाला बेपत्ता झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी केले होते. त्यामुळे "अटाला' इस्रायलमधून परत येण्याची वाट कदाचित गोवा पोलिस पाहत असावेत. पोलिसांकडून "अटाला' ड्रग विकत घेत असल्याचे आणि पैसे देऊन ड्रग प्रकरणात पकडलेल्या त्याच्या माणसांना पोलिस सोडत असल्याचे छायाचित्रीकरण "यू ट्यूब'वर झळकल्यानंतर एका पोलिस निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. तर, अटाला याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलगा रॉय नाईक याचाही हात असल्याचा आरोप यावेळी झाला होता. मात्र रॉय यांनी आपल्यावर झालेला आरोप फेटाळून लावला आहे. या सर्व घटनेची "सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची मागणी होत असतानाच जामिनावर सुटलेला "अटाला' गोव्यातून फरार झाला होता.

No comments: