खासगी बसमालक राजी - १ ऑक्टोबरपासून कार्यवाही
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - खाजगी बसमध्ये तिकीट न दिल्यास १ ऑक्टोबर २०१० पासून बसमालकांना प्रतिप्रवासी १०० रु. दंड ठोठावण्यात येणार आहे. आज वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्या कक्षात झालेल्या खासगी बस मालकांच्या बैठकीत बसमालकांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला.
कदंबकडून खाजगी बसवाल्यांची सतावणूक होत असल्याच्या व अन्य काही मागण्यांच्या संदर्भात अखिल गोवा खाजगी बस मालक संघटना व वाहतूक खाते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी बस मालक संघटनेने आपणाला न्याय देण्याची विनंती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना केली असता मुख्यमंत्र्यांनी आज (दि.२७) बस मालकांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्याची आजची बैठक स्वतः न घेता वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याच मार्गदर्शनाखाली घेण्याचा आदेश दिल्याने नाराज झालेल्या बसमालकांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती. परंतु, आज त्यांनी वाहतूक संचालकांच्या कक्षात उपस्थिती लावली व अनेक मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढला.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी वाहतूक संचालकांनी कदंबचा ताबा घेतला नसल्याचे वृत्त जाहीर केल्यामुळे संघटनेने आजच्या बैठकीत भाग घेतला असल्याचे सांगितले.
बैठकीविषयी अरुण देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, बसमालक संघटनेने १ ऑक्टोबरपासून बस वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे वचन दिले असून चालक व वाहकाने गणवेश घालणे, वेळेवर गाड्या सोडणे, प्रत्येक प्रवाशाला तिकीट देणे व तिकीट न दिल्यास प्रत्येक प्रवाशामागे १०० रु. दंड आकारला जाणे, अधिकतर प्रवाशांनी तिकीट घेतल्यास व एखाद्या प्रवाशाने तिकीट न घेतल्यास त्या प्रवाशाला कायद्याप्रमाणे दंड आकारणे आदी गोष्टींना बस मालक संघटनेने संमती दिली आहे. म्हापसा - पणजी कदंब शटल सेवेमुळे खासगी बसेसना बसणारा फटका कमी करण्यासाठी या मार्गावर फक्त सहाच कदंब बसेस चालवणे, वास्को येथे बाजारापर्यंत जाणाऱ्या बसेस स्थानकावरच रोखणे आदी मागण्यांवर चर्चा होऊन समाधानकारक तोडगा काढण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
या बैठकीला वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्यासोबत कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हिनिसियो फुर्तादो तसेच खाजगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष शिवदास कांबळी, सरचिटणीस सुदीप ताम्हणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tuesday, 28 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment