Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 26 September 2010

अबु सालेमच्या हस्तकावर हल्ला

मुंबई, दि. २५ - गुन्हेगारी जगतातील कुख्यात डॉन अबु सालेमवर दोनच महिन्यांपूर्वी मुंबईतील अतिशय कडेकोट सुरक्षा असणाऱ्या ऑर्थर रोड कारागृहात झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज अबु सालेमच्याच एका जवळच्या हस्तकावर कारागृहातीलच चार कैद्यांनी हल्ला केला.
अबु सालेमचा जवळचा सहकारी समजल्या जाणाऱ्या मेहंदी हसनवर इतर गुन्हेगारी टोळीतील गुंडांनी धारदार शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. जखमी मेहंदी हसनवर कारागृहातीलच इस्पितळात उपचार सुरू आहेत. १९९५ साली बिल्डर प्रदीप जैनवर हल्ला केल्याप्रकरणी मेहंदी हसन कारागृहात आहे. आज त्याच्यावर हल्ला करण्यात आला, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी करण्यात आले. त्याच्यावर लगेचच कारागृहातील दवाखान्यातच उपचार सुरू करण्यात आले, असे वृत्त असले तरी दुसऱ्या एका वृत्तानुसार त्याला जे. जे. इस्पितळात हलविण्यात आले आहे.
हसनवर कारागृहातीलच ज्या चार कैद्यांनी हल्ला केला ते सर्व कुख्यात गुंड पांडव पुत्र गॅंगचे आहेत. या गुंडांशी हसनची काही बाचाबाची झाली. त्यातूनच पांडव पुत्र गॅंगच्या चार सदस्यांनी हसनवर आज सकाळी हल्ला केला. हल्लेखोरांची नावे समजू शकलेली नाहीत.
यापूर्वी गेल्या २४ जुलै रोजी ऑर्थर रोड कारागृहातच माफिया डॉन अबु सालेमवर दाऊद टोळीतील मुस्तफा डोसा या गुंडाने टोकदार चमच्याने हल्ला केला होता. सालेमच्या नाकावर व मानेवर त्यामुळे जखमा झाल्या होत्या. या हल्ल्यानंतर सालेमला तळोजा कारागृहात हलविण्यात आले होते. तर सालेमवर जीवघेणा हल्ला केला म्हणून डोसाला अटक करण्यात आली होती. गॅंगवॉरच्या या घटनेनंतर ऑर्थर रोड कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. परंतु, आजच्या गॅंगवॉरच्या घटनेमुळे या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आजच्या घटनेप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, असे समजते. आम्ही हसनचे बयाण नोंदवून घेत आहोत. त्यानंतरच काय कारवाई करावयाची याचा निर्णय घेण्यात येईल, असे एका वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्याने सांगितले. हसन हा सालेमचा जुना कारचालक तसेच १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील एक आरोपी आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.

No comments: