Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 26 September 2010

जीसीए प्रशिक्षकांवर "सॅग'कडूनच खर्च

ऍड.आयरिश यांनी केला पर्दाफाश

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) - गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या प्रशिक्षकांना २००५ ते आजपर्यंत वेतनापोटी १७ लाख ६९ हजार २५२ रुपये गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे ("सॅग') खर्च करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून आपण कोणतीही मदत घेत नाही, असा पवित्रा घेत स्वतःला माहिती हक्क कायदा लागू करण्यास टाळाटाळ करणाऱ्या "जीसीए'चे पितळ या घटनेमुळे उघडे पडले आहे.
सामाजिक कार्यकर्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी "एसएजी'कडून माहिती हक्क कायद्याखाली ही माहिती प्राप्त केली आहे.२००५ सालापासून आत्तापर्यंत "सॅग'तर्फे "जीसीए' ला एकूण २१ प्रशिक्षण देण्यात आले व या प्रशिक्षकांवर करण्यात आलेल्या खर्चाची विस्तृत माहितीही ऍड.रॉड्रिगीस यांना उपलब्ध झाली आहे. दरम्यान,"सॅग'कडे "जीसीए'कडून करण्यात आलेल्या लेखी विनंतीनुसारच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.
"जीसीए'च्या विनंतीवरून अनिल आरोलकर या प्रशिक्षकाला जून २००९ मध्ये पर्वरी येथील गोवा क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले आहे. आरोलकर यांना देण्यात येणारे ४१,४०६ रुपयांचे दरमहा वेतन "सॅग'कडूनच अदा केले जात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
माहिती हक्क कायद्याखाली माहिती देण्यास नकार देणाऱ्या "जीसीए' विरोधात ऍड.आयरिश यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर गोवा राज्य मुख्य माहिती आयुक्त मोतीलाल केणी हे आपला निवाडा १ ऑक्टोबर रोजी देणार आहेत. आयरिश व राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्यातील कायदेशीर लढ्याचा एक भाग म्हणून ऍड. रॉड्रिगीस यांनी "जीसीए'कडे त्यांचे कायदा सल्लागार म्हणून काम पाहणारे सुबोध कंटक यांना शुल्कापोटी किती रक्कम अदा केली याचा तपशील माहिती हक्क कायद्याखाली मागितला होता. "जीसीए' ने राज्य सरकार तथा "सॅग' कडून आपण कोणतीही आर्थिक मदत घेत नाही, असा दावा केला होता. तसेच आपण माहिती हक्क कायद्याखाली येत नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळेच ऍड. रॉड्रिगीस यांनी या निर्णयाविरोधात "जीसीए'ला माहिती आयुक्तालयात खेचले आहे.

No comments: