बदाऊन, दि. २६ - भाजपाचे युवा नेते वरुण गांधी यांचे लग्न ठरले असून या वर्षाअखेर ते यामिनी नामक बंगाली कन्येशी विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. ही माहिती वरुणची माता मनेका गांधी यांनी दिली. त्या म्हणाल्या की, वरुणचा विवाह यामिनी राय चौधरी नामक बंगाली कन्येशी ठरला आहे. या वर्षीच हे शुभमंगल उरकण्याचा विचार आहे. या समारंभाला गांधी कुटुंबातील सर्वांनाच निमंत्रण दिले जाणार आहे. सोनिया, राहुल, प्रियंका यांच्यासह सर्व जवळचे नातेवाईक या समारंभाला येतील, अशी अपेक्षा आहे.
राजीव आणि संजय गांधी या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावा आहे. पण, असे असूनही वरुण आपली बहीण प्रियंकाच्या लग्नाला १९९७ मध्ये उपस्थित राहिला होता. तेव्हा तो किशोरवयीन होता. आता वरुणच्या लग्नात सर्व भावंडं येतील, अशी आशा मनेका गांधी यांना वाटत आहे.
गांधी घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील ही पहिलीच सून राहणार असल्याने या लग्नसमारंभाविषयी सर्वांनाच उत्सुकता राहणार आहे. त्यातही वरुण गांधी यांनी अल्पावधीतच राजकारणात चांगलीच लोकप्रियता मिळविल्यानेे हा समारंभ प्रसार माध्यमांसाठीही आकर्षणाचे केंद्र राहणार, असे मानले जात आहे. पिलीभीत येथील भाजपाचे खासदार असणारे वरुण गांधी यांची यंदा मार्चमध्ये पक्षाचे महासचिव म्हणूनही निवड झाली आहे.
Monday, 27 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment